काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेतील गटबाजीने भाजपाची सोय

By admin | Published: July 14, 2017 01:44 AM2017-07-14T01:44:45+5:302017-07-14T01:44:45+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतही उघड गटबाजी होत असल्याने सत्ताधारी भाजपाची आयतीच सोय झाली आहे.

Congress, NCP, BJP combine in the army | काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेतील गटबाजीने भाजपाची सोय

काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेतील गटबाजीने भाजपाची सोय

Next

विरोध करणार कोण ? : वर्चस्वाची लढाई, पक्षातच शक्ती खर्ची
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतही उघड गटबाजी होत असल्याने सत्ताधारी भाजपाची आयतीच सोय झाली आहे. हे तीनही प्रमुख पक्ष अंतर्गत सारवासारव करण्यात गुंतले आहे. त्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. त्यामुळे भाजपाला विरोध करणार कोण असा प्रश्न आहे.
जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष आहेत. त्यातील भाजपा व शिवसेना सत्तेत आहेत. त्यातही शिवसेना अधूनमधून आंदोलनाची भूमिका घेते. विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीवर जनतेच्या समस्या सोडविण्याची, त्यासाठी सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालविलेल्या ज्येष्ठ नेत्यांमधील गटबाजी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. संधी मिळेल तिथे नेते मंडळी एकमेकांना दिल्लीपर्यंत उघडे पाडण्याचा प्रयत्न करतात. २०१४ च्या निवडणुकीत चारही मुंड्या चित होऊनही नेते मंडळी सुधरायला तयार नाही. नेत्यांच्या या भांडणात चक्क पक्ष संपायला आला आहे. गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शवयात्रा आंदोलन होत आहे. या आंदोलनातसुद्धा काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. यवतमाळ व पुसद असे दोन सत्ता केंद्र झाल्याचे दिसून येते. पक्षातील गटबाजी आधी जिल्हा परिषद आणि आता नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अधोरेखीत झाली आहे. नेत्यांमध्येच एक दादाचा, एक साहेबांचा अशी विभागणी झाल्याने कार्यकर्तेही विभागले गेले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी सारखीच गटबाजी आता शिवसेनेतही उफाळून आली आहे. जिल्हा प्रमुखाची परस्पर झालेली नियुक्ती एवढा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेना अभेद्य मानली जात होती. पक्षाच्या नेत्यांमध्ये एकजूट दिसत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उघडपणे गटबाजी दाखविण्याची हिंमत केली नाही. परंतु आता नेतेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. आता प्रमुख दोन गट पडल्याने शिवसेनेची शक्ती विभागली जाण्याची व जनतेच्या प्रश्नावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना नेत्यांमधील या भांडणाने कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणेतसुद्धा चुकीचा संदेश जातो आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीनही प्रमुख पक्षांना गटबाजीने पोखरले आहे. पक्षातील ही भांडणे मिटविण्यातच बहुतांश शक्ती खर्च होत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोण आणि भाजपाला रोखणार कोण असा प्रश्न आहे.
तीन प्रमुख पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गटबाजीत गुंतलेले आहेत. तर दुसरीकडे भाजपा त्यांच्या या ‘व्यस्ततेचा’ पुरेपूर फायदा उठविताना दिसत आहे. भाजपाने जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाना काबीज केला आहे. लगतच्या भविष्यात जिल्ह्यात बंद असलेले सहकारातील अन्य उद्योग (साखर कारखाने, सूत गिरण्या, जिनिंग-प्रेसिंग संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, सेवा सोसायट्या आदी) ताब्यात घेण्याची व्युहरचना भाजपाने केली आहे. विरोधी पक्षाचा कोणताही अडथळा नसल्याने भाजपाची ही विजयी घौडदौड जिल्ह्यात सर्वदूर पोहोचण्याची चिन्हे आहेत. तीन पक्षातील गटबाजीचा भाजपाला आयताच फायदा मिळतो आहे. उलट या तीनही पक्षांना गटबाजीत आणखी गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न भाजपा पडद्यामागून सतत करीत असल्याचे सांगितले जाते. वर्चस्वाच्या लढाईची झापड डोळ्यावर चढविलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील नेते मंडळी मात्र भाजपाची ही खेळी ओळखण्यात अपयशी ठरले आहे. या मुद्यावर नेते मंडळी अद्यापही जागृत झालेली नाही.

Web Title: Congress, NCP, BJP combine in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.