काँग्रेस, शिवसेना, प्रहारचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:02 PM2019-03-25T22:02:04+5:302019-03-25T22:02:48+5:30
लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. बहुतांश प्रमुख उमेदवारांनी सोमवारीच नामांकन दाखल केले. या मतदारसंघात एकूण ३० उमेदवारांनी ३९ नामांकन दाखल केले आहे. ८७ नामांकन अर्जांची उचल झाली होती. त्यापैकी ३९ सादर झाले. उमेदवारांना २८ मार्चपर्यंत आपले नामांकन मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप केले जाईल.
नामांकनासाठी काँग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर थेट महादेव मंदिरात ही नेते मंडळी दर्शनासाठी गेली. या मेळाव्याच्या व्यासपीठावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते, आमदार उपस्थित होते. काँग्रेस आघाडीच्यावतीने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नामांकन दाखल केले.
शिवसेनेच्यावतीने भावना गवळी यांनी नामांकन दाखल केले. पाचव्या टर्मसाठी त्यांचे हे नामांकन आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई खास नामांकनासाठी अमरावतीवरून आले होते. शिवसेनेनेही नामांकनापूर्वी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भाजपा-शिवसेनेचे मंत्री, आमदार व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने शेतकरी विधवा व अंगणवाडी सेविका वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यवतमाळात नुकत्याच पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वैशाली येडे या उद्घाटक होत्या. या नामांकनासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धत अवलंबिली. त्यांनी येथे शिवतीर्थावर २५ बॉटल्स रक्तदान करून नामांकन रॅलीला प्रारंभ केला. बैलगाडीतून उमेदवाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आले. आमचा उमेदवार गरीब आहे, निवडणूक लढण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही, त्यामुळे जनतेनेच हा पैसा द्यावा म्हणून लोकवर्गणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहरात झोळी फिरविली. प्रहार कार्यकर्त्यांची ही आगळीवेगळी पद्धत यवतमाळकरांसाठी लक्षवेधक ठरली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांनीही सोमवारी नामांकन दाखल केले.
भाजपाच्या बंडखोराचे शिवसेनेपुढे आव्हान
काँग्रेस व शिवसेना या प्रमुख दोन्ही पक्षाच्या उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी अपक्ष नामांकन दाखल केल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. या बंडोबांना थंड करताना प्रमुख उमेदवारांची कसोटी लागणार आहे. यातील काहींनी केवळ चर्चेसाठी तर काहींनी ‘तडजोडी’साठी नामांकन दाखल केल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. पुसद तालुक्यातील एका अपक्षाने सलग तब्बल ३३ व्या निवडणुकीसाठी आपले नामांकन दाखल केले. अखेरचा दिवस असल्याने नामांकनासाठी गर्दी होईल, याचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. एलआयसी चौकातच सर्वांना रोखले गेल्याने उमेदवार व त्यांच्या सोबतीला असलेल्या नेत्यांना पायदळ जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागले. तिरंगा चौकात एकाच वेळी अनेकांच्या रॅली आल्याने कोण कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा, कोण कुणासाठी आला हे ओळखणे कठीण झाले होते. काँग्रेस उमेदवाराच्या व्यासपीठावर झाडून आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.