दारव्हा तालुक्यात काँग्रेसची पूर्ववैभवासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:47 AM2021-08-21T04:47:24+5:302021-08-21T04:47:24+5:30
दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर विविध ...
दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर विविध उपक्रमांमुळे नेते, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी ही धडपड असून, यात पक्ष कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.
एकेकाळी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९६७ व १९७८ ची विधानसभा निवडणूक सोडली, तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु २००४ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी तब्बल २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आणि काँग्रेसच्या या किल्ल्याचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली. फेररचनेत दिग्रस मतदार संघ झाल्यानंतर दोनदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी तसेच वर्तमान लोकसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार क्षेत्रातसुध्दा पिछेहाट झाली. यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली होती. परंतु सध्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे.
पक्षांतर्गत कार्यक्रम, कार्यकर्ता बैठका, मेळाव्याचे आयोजन शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली जात आहे. पक्ष लाईमलाईट ठेवला जात असल्याने त्याचा लाभ होताना दिसत आहे. अपवाद वगळता अनेक स्थानिक नेते काँग्रेसमधे टिकून आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व, प्रत्येक गावात कार्यकर्ते, युवकांची फळी, अनेक ग्रामपंचायत, सोसायटीवर वर्चस्व या पक्षाच्या जमेच्या बाजू आहे. आगामी संस्थांच्या निवडणुकीसाठी मेळावा घेऊन काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी जोश भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता या सर्व बाबींचा पक्षाला लाभ होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बाॅक्स
सत्तेच्या लाभापासून वंचित
राज्यात सत्तेत सहभाग असला, तरी तालुक्यात मात्र काँग्रेस सत्तेच्या लाभापासून वंचित आहे. मंडळ, महामंडळ सोडा, साध्या तालुका समित्यांवर कुणालाही संधी मिळाली नाही. कोणतीही कामे होत नसल्याचे शल्य आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना सामावून घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे.
कोट
तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. विविध उपक्रम राबवून चालना दिल्याने सक्रियता वाढली. पक्षाची स्थिती सुधारल्याने येणाऱ्या निवडणुकांत चांगला फायदा होईल प्रकाश नवरंगे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस दारव्हा