काँग्रेसमध्ये लोकसभेसाठीही रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:39 PM2018-08-06T21:39:15+5:302018-08-06T21:39:43+5:30

आतापर्यंत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत आणि विधानसभा मतदारसंघात दिसणारी गटबाजी आता लोकसभा मतदारसंघातही दिसू लागली आहे. विधान परिषदेचा पत्ता कट झाल्यानंतर लोकसभेच्या तयारीला लागलेल्या माणिकरावांपुढे मोघेंनी अचानक स्पर्धक म्हणून आव्हान उभे केले आहे.

In the Congress, there is a tug of war for the Lok Sabha | काँग्रेसमध्ये लोकसभेसाठीही रस्सीखेच

काँग्रेसमध्ये लोकसभेसाठीही रस्सीखेच

Next
ठळक मुद्देमाणिकराव लागले तयारीला : शिवाजीरावांचीही मोर्चेबांधणी, गटबाजीने कार्यकर्ते मात्र संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आतापर्यंत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत आणि विधानसभा मतदारसंघात दिसणारी गटबाजी आता लोकसभा मतदारसंघातही दिसू लागली आहे. विधान परिषदेचा पत्ता कट झाल्यानंतर लोकसभेच्या तयारीला लागलेल्या माणिकरावांपुढे मोघेंनी अचानक स्पर्धक म्हणून आव्हान उभे केले आहे.
अखेरच्या क्षणी माणिकराव ठाकरेंची विधान परिषदेची उमेदवारी कापून ती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांना देण्यात आली. त्यासोबतच काँग्रेसचे विधान परिषदेचे उपसभापतिपदही गेले. यवतमाळ-वाशिम लोकसभा लढवायची असल्याने माणिकरावांना एमएलसी दिली नाही, असे त्यांचे समर्थक सांगत आहे. त्यात तथ्यही असावे, कारण उपसभापतिपदाचा राजीनामा देताच माणिकराव लोकसभेच्या तयारीला लागले आहे. एकाचवेळी त्यांनी यवतमाळ व वाशिम या दोनही जिल्ह्यात मोर्चेबांधणी चालविली आहे. वाशिम, कारंजा या विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कार्यक्रम राबवित माणिकराव सक्रिय झाले. त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातही माणिकरावांच्या ‘अ‍ॅक्टिव्हीटी’ वाढल्या आहेत.
ठाकरेंना मोघेंचे आव्हान
माणिकराव ठाकरेच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार असे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात ही स्थिती नाही. कारण तिकडे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शिवाजीराव मोघे हेसुद्धा याच मतदारसंघातून लोकसभेची तयारी करीत आहेत. ‘आपल्याकडे पैसे नाहीत’ असे ठेवणीतले वाक्य बोलून शिवाजीराव जाहीररित्या आपण फारसे उत्सूक नसल्याचे दाखवित असले तरी प्रत्यक्षात त्यांनी दिल्लीत आपल्या गॉड फादरमार्फत उमेदवारीसाठी आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांशी बैठका वाढविल्या आहेत.
पराभवातही मोघेंच टॉप!
२०१४ च्या निवडणुकीत कोणतीही तयारी नसणे, १५ दिवसांचा प्रचार, मोदींची प्रचंड लाट, नवखा मतदारसंघ, भाजपामय वातावरण एवढ्या सर्व प्रतिकूल बाजू असताना आपण केवळ ९० हजार मतांनी पराभूत झालो, हे मोघे आवर्जून सांगतात. याचवेळी राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्यांचे पराभवाचे अंतर दोन ते अडीच लाख मतांचे असल्याची आठवणही ते करून देतात.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आपल्याला कसा पोषक आहे, या मतदासंघातील मुस्लीम, दलित, आंध, ओबीसी, बहुजन समाज काँग्रेसला कसा पूरक आहे व बंजारा समाज आपणाला कसा मानतो, हे ते दाव्याने सांगतात. या बळावरच आपण लोकसभेचा गड सर करू शकतो, असे ते छातीठोकपणे सांगत आहे. पैशाच्या तडजोडीबाबत ‘चमत्कार’ होण्याची आशा असल्यानेच मोघे लोकसभेच्या तयारीला लागले आहे.
ठाकरेंचे तळ्यात की मळ्यात
माणिकराव ठाकरेंचे अद्यापही नेहमीप्रमाणे तळ्यात की मळ्यात सुरू आहे. पिता की पुत्र, लोकसभा की विधानसभा हा संभ्रम कायम ठेवण्यात माणिकराव धन्यता मानतात.
माणिकराव राज्यात ‘टॉप टेन’मध्ये
माणिकराव राज्यात प्रमुख टॉप टेन नेत्यांमध्ये गणले जातात. त्यामुळे राज्यात राहिल्यास कॅबिनेट मंत्रिपद पक्के समजतात. केंद्रात जाऊन काय पदरी पडणार, हा त्यांचा खासगीतील सवाल आहे. म्हणूनच आतापासून स्वत: प्रचाराला लागायचे आणि अखेरच्या क्षणी युवकाच्या कोट्यातून पुत्रासाठी उमेदवारी खेचून आणायची, असा त्यांचा प्रयत्न दिसतो.
दिग्रस मतदारसंघात काँग्रेस मायनस
वास्तविक माणिकरावांची किमान त्यांच्या परंपरागत मानल्या जाणाऱ्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारात उपलब्धी काहीच सांगता येणारी नाही. प्रत्यक्षात माणिकराव सांगत असले तरी हा मतदारसंघ त्यांचा परंपरागत राहिलेलाच नाही. गेल्या २० वर्षात ते लोकांमधून निवडून आले नाही. त्यांच्या म्हणवून घेणाºया दिग्रस मतदारसंघात प्रत्येक वेळी काँग्रेस उमेदवाराची वाताहत झाली आहे. त्याचे अपयश हेच माणिकरावांचे जणू यश राहिले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अन्य कुणी नेतृत्व तयार होऊ नये, असाच प्रयत्न जणू माणिकरावांचा राहिला आहे.
गटबाजीच्या राजकारणाचे फलित
दिग्रस-दारव्हा सोडून यवतमाळात पुत्रासाठी धाव घेतलेल्या माणिकरावांना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेल्याचे पाहावे लागले. गटबाजीच्या राजकारणाचे हे फलित मानले जाते. गत लोकसभा निवडणुकीत माणिकरावांनी सहा विधानसभा मतदारसंघात ज्या उमेदवारांसाठी आग्रह धरला होता, त्यातील चौघांना डिपॉझिट गमवावे लागले.

मोघेंच्या ‘ओपन’मधील उमेदवारीला प्रदेशाध्यक्षांचा आक्षेप
यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहे. या मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारे अ‍ॅड.शिवाजीराव मोघे काँग्रेसचे उमेदवार कसे काय होऊ शकतात, हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांचा आक्षेप आहे. गेल्यावेळीही तुम्ही या ओपन सिटवर उमेदवार असायला नको होते, असे मत चव्हाण यांनी नोंदविले. त्यामुळे हाच मुद्दा शिवाजीरावांना यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळविताना अडचणीचा ठरू शकतो.

-तर भावना गवळींना होणार एकतर्फी फायदा
माणिकरावांना एमएलसी नाकारताच ‘जिल्ह्यात कुणबी-मराठ्यांचे नेतृत्व संपविले’ असा संतप्त सूर ऐकायला येऊ लागला. लोकसभेत मोघे काँग्रेसचे उमेदवार असल्यास कुणबी-मराठा समाजातील या संतप्त भावनेचा एकतफीर फायदा भावना गवळींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेतील गटबाजीचा फायदा मोघेंना
शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात गटबाजी आहे. त्याचे पडसाद आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भावना गवळींचा पराभव हे राठोड समर्थकांचे टार्गेट असू शकते. तसे झाल्यास या समर्थकांना पर्याय कोण, हा प्रश्न राहणार आहे. माणिकराव ठाकरे यांना या समर्थकांची साथ मिळण्याची आशा कमी आहे. कारण माणिकराव निवडून आल्यास संजय राठोड यांच्या दिग्रस-दारव्हा या मतदारसंघात त्यांचा हस्तक्षेप व डोकेदुखी वाढण्याची भीती आहे. बंजारा समाजाचा तिसरा पर्याय असल्यास नवे नेतृत्व उभे राहण्याची हुरहुर या राठोड समर्थकांना राहू शकते. युती झाल्यास भाजप उमेदवाराच्या पाठीशी राहाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशावेळी अ‍ॅड.शिवाजीराव मोघे हे राठोड समर्थकांसाठी सक्षम पर्याय ठरू शकतात. कारण मोघे हे संजय राठोड यांना कोणत्याच बाजूने त्रासदायक होण्याची शक्यता नाही. हे समीकरण डोळ्यापुढे ठेऊनच मोघेंनी लोकसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.

Web Title: In the Congress, there is a tug of war for the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.