राष्ट्रवादीच्या खेळीकडे काँग्रेसचे लक्ष
By admin | Published: July 26, 2014 02:44 AM2014-07-26T02:44:54+5:302014-07-26T02:44:54+5:30
विधानसभेसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस काय
अजित पवार, सुनील तटकरेंचा दौरा : विधानसभेच्या वाढीव जागांवर जोर
यवतमाळ : विधानसभेसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस काय रणनीती तयार करते याकडे काँग्रेसचे लक्ष लागलेले आहे. ही रणनीती ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शनिवारी यवतमाळात येत आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वरच्या स्तरावर विधानसभेच्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादीने १४४ जागांवर दावा सांगितला आहे. तर एकही जागा वाढवून देणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यात बोलणी सुरू असतानाच इकडे राष्ट्रवादीने जिल्हा स्तरावरही आपली मोर्चेबांधणी चालविली आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोनही पक्ष करीत आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात काय स्थिती राहील याचा आढावा घेण्यासाठी निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेऊन २६ जुलै रोजी यवतमाळात येत आहेत.
जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. त्यापैकी मनोहरराव नाईकांच्या रुपाने पुसद हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात निश्चितच राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नगरपरिषद, पंचायत समिती येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्याच आधारावर राष्ट्रवादीने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ वाढवून देण्याची मागणी रेटली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट शरद पवार यांना मुंबईत भेटून जिल्ह्यातील पुसद सोबतच यवतमाळ, दिग्रस आणि उमरखेड या तीन नव्या मतदारसंघांवर दावा सांगितला होता.
राष्ट्रवादीचा सर्वाधिक जोर हा यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर आहे. हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. तीन नव्या मतदारसंघांवर दावा सांगून वाटाघाटीत किमान यवतमाळ मतदारसंघ तरी सुटावा ही राष्ट्रवादीची प्रेशर टॅक्टीस असण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या शनिवारच्या बैठकीत विधानसभेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यासाठी काय भूमिका ठरते याकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
४यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चढाओढ आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांसोबतच एक माजी राज्यमंत्री, खुद्द प्रदेशाध्यक्षांनी मुलासाठी या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. त्यातच राष्ट्रवादीने यवतमाळसाठी जोरदार फिल्डींग लावल्याने काँग्रेससमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.