विदर्भातील मागास जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडा; माजी खासदार विजय दर्डा यांची मागणी
By विशाल सोनटक्के | Published: December 28, 2022 11:38 AM2022-12-28T11:38:11+5:302022-12-28T11:38:26+5:30
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा
यवतमाळ :समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच झाले. याबाबत मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो. दहा जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील ३९१ गावांतून हा महामार्ग जात आहे. महामार्गामुळे आर्थिक गतिविधी वाढून या भागात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा आता विदर्भातील ग्रामीण जिल्ह्यांना झाला पाहिजे, त्यासाठी समृद्धी महामार्गाला यवतमाळसह विदर्भातील मागास जिल्हे जोडावेत, अशी मागणी राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी केली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची गरजही त्यांनी शासनाकडे व्यक्त केली.
समृद्धी महामार्गामुळे विदर्भाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे. आता विकासापासून दूर असलेल्या यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यांना या महामार्गाची थेट कनेक्टिव्हिटी मिळवून द्यायला हवी. शिवणी आणि देवगाव फाटा अशा दोन मार्गाने समृद्धी महामार्ग यवतमाळला जोडता येऊ शकतो. तसेच नागपूरनंतर तो पुढे गोंदियापर्यंत नेता येईल, तर इकडे केज-धारुरकडे जाणारा महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविता येईल, नांदेड शहराला जालना टी-पॉइंटपासून द्रुतगती महामार्गाने जोडण्याचा निर्णय राज्य शासनाने ज्याप्रमाणे घेतला, त्याचप्रमाणे विदर्भातील या मागास जिल्ह्यांनाही महामार्गाची थेट कनेक्टिव्हिटी मिळवून द्यायला हवी. त्यासाठी राज्य शासनाने इच्छाशक्ती दाखवावी, असेही ते म्हणाले.
विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा प्रकल्प म्हणून वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला हवा. त्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा. २८४ किमीच्या या रेल्वे मार्गामुळे यवतमाळसह विदर्भाला मोठा फायदा होऊ शकतो. या प्रकल्पाचे ७७ किमीचे काम मध्य रेल्वेकडून तर यवतमाळ ते नांदेड असे २०६ किमीचे काम रेल्वे निगमकडून करण्यात येत आहे. केंद्र शासनाने विशेष रेल्वे प्रकल्पात या उपक्रमाचा समावेश केला आहे. मात्र, त्यानंतरही या प्रकल्पाला आवश्यक गती प्राप्त होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कालबद्ध वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करायला हवे. यवतमाळसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात उद्योगांची कमी आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. हिंदुस्थान लिवर सारख्या मोठ्या उद्योगांचे यापूर्वीच स्थलांतर झाले आहे. अशा स्थितीत यवतमाळसह विदर्भातील मागास भागात उद्योग आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी या भागात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. तशी विनंतीही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार कीर्ती गांधी यांचीही उपस्थिती होती.
नुसते मृतांचे आकडे मोजू नका, भारीजवळ अंडरब्रिज बांधा
यवतमाळ-नागपूर राष्ट्रीय मार्गावर भारी येथे नुकत्याच झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी यवतमाळ-कळंब मार्ग तीन तास रोखून संताप व्यक्त केला. मागील काही वर्षांत या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधित विभाग मूग गिळून गप्प आहे. या महामार्गावरील भारी येथे अंडरब्रिज बांधावा, अशी मागणी मी महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती. नितीन गडकरी यांनाही याबाबत पत्र लिहिले होते. मात्र, कार्यवाही होताना दिसत नाही. यवतमाळच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेमार्फत सर्वेक्षण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अहवाल सादर केला. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. येथील वाढते अपघात पाहता राज्य शासनाने संवेदनशीलता दाखवित येथे तातडीने अंडरब्रिज बांधावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. मागील सरकारच्या काळात निधी न मिळाल्याने मध्यंतरी हे काम रेंगाळले होते. आता या प्रश्नाकडे मी व्यक्तिश: लक्ष देत असून, कामाला पुन्हा गती दिली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यवतमाळसह विदर्भातील मागास जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडण्याची आग्रही मागणी केली असता, राज्य शासन याबाबत सकारात्मक आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य.