दलित-मुस्लीमांना दूर ठेवण्याचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:46 PM2018-04-15T23:46:13+5:302018-04-15T23:46:13+5:30
मोदी सरकार मुस्लीम समाजाला शरीयतपासुन दूर नेण्याचे षडयंत्र रचत असून दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असउद्दीन ओवेसी यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : मोदी सरकार मुस्लीम समाजाला शरीयतपासुन दूर नेण्याचे षडयंत्र रचत असून दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असउद्दीन ओवेसी यांनी केला.
उमरखेड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर आमदार इम्तयाज जलील, मुफ्ती असफाक कासमी, इरफानभाई, नगरसेवक मुजीब बागवान, जलील कुरेशी आदी उपस्ति होते. पुढे बोलताना ओवेसी यांनी मोदी आणि योगी सरकारसह कॉग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला. ‘तलाक’च्या मुद्यावर पंतप्रधान मुस्लीम महिलांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत, तर जम्मूमध्ये आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारावर बोलायला त्यांना वेळ मिळत नाही. केंद्र शासनाच्या या धोरणाविरूद्ध ज्या महिला रस्त्यावर उतरल्या, त्यांचे ओवेसी यांनी कौतुक केले.
मुस्लीम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘तलाक’वर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकार त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कायदा तयार करीत असल्याबद्दल निषेध केला. आता दलित व मुस्लीम बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी जम्मूत अत्याचार करून मृत पावलेल्या आठ वर्षीय बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उमरखेडसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संसदेत आवाज का उठविला नाही
मजलीस पक्षावर भाजपा समर्थक असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस व राष्दवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ओवेसी यांनी दिला. संसदेत जेव्हा ‘तलाक’वर चर्चा सुरु होती, त्यावेळी कोणत्याही धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांनी किंवा त्या पक्षातील मुस्लीम खासदारांनी आवाज का उठवला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.