संविधानाने उच्चपदावर गेलेलेही समाजद्रोही ठरले
By admin | Published: April 13, 2017 12:58 AM2017-04-13T00:58:34+5:302017-04-13T00:58:34+5:30
महात्मा फुले यांचे पुस्तक ‘सार्वजनिक सत्यधर्म’, डॉ. आंबेडकरांचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘भारतीय संविधान’
गुरूनामसिंह शाक्य : ‘समता पर्वात’ प्रबोधन, सत्यधर्म व धम्मक्रांती विषयावर मार्गदर्शन
यवतमाळ : महात्मा फुले यांचे पुस्तक ‘सार्वजनिक सत्यधर्म’, डॉ. आंबेडकरांचे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘भारतीय संविधान’ ही पुस्तकेच बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्यात सक्षम आहेत. मानवी विकासाचा, करुणेचा एक प्रवाह या तीनही पुस्तकातून वाहतो आहे. महात्मा फुलेंचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठीच डॉ. आंबेडकर झिजले. संविधानाच्या माध्यमातून बहुजनांच्या विकासाचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. संविधानामुळेच अनेकांना उच्च पदे मिळाली. परंतु हे लाभ त्यांनी स्वत:पुरतेच मर्यादित ठेवले. समाजालाही हे लाभ मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. ही स्वार्थी मंडळी फुले-आंबेडकर यांच्या विचारांशी, समाजाशी आणि राष्ट्राशीही कृतघ्न झाली आहे, असे मत गुरूनामसिंह शाक्य (अलाहाबाद) यांनी व्यक्त केले.
येथील समता मैदानात आयोजित समता पर्वात ‘महात्मा फुलेजी का सार्वजनिक सत्यधर्म ओर डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी की धम्मक्रांती’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. सविता हजारे अध्यक्षस्थानी होत्या.
गुरुनामसिंह शाक्य पुढे म्हणाले, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, जाती इत्यादी तथाकथित गोष्टींची चर्चा महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्मातून केली आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून बाबासाहेबांनी अत्यंत कारूनिक पद्धतीने बुद्ध तत्त्वज्ञानाचा सारांश सांगितला आहे. स्वत: स्वत:चे शिल्पकार होण्याचा संदेश दोनही पुस्तकात आहे. आंतरराष्ट्रीय आणि आंतरधर्मीय संकल्पना दोघांनीही मांडल्या आहेत. सर्वांना समान संधी आणि विकासाचे सूत्र हेच त्यांचे जीवनध्येय होते. आपण केवळ त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करून उपयोग नाही. त्यांचे विचार आचरणात येणे महत्त्वाचे आहे. यातच आम्ही कमी पडतो आहे. इतरांचे दोष दाखविण्यापेक्षा आपण आपल्या कल्याणाचा विचार करणे आवश्यक असताना नेमके तेच आम्ही टाळतो. राग, लोभ, अहंकार, इर्षा, द्वेष, मत्सर यांचे भंजन करणारा तो भगवान. भगवान हा पाली शब्द सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठीच वापरला असून बुद्ध हेच भगवान होते. एवढा महत्त्वाचा हा शब्द नंतरच्या काळात अनेकांना वापरला गेला आणि त्या शब्दाचे महात्म्य संपुष्टात आले. आपण धार्मिक असल्याचे फक्त ढोंग करतो. धार्मिक म्हणविणाऱ्यांनीच या जगात सर्वात जास्त उन्माद केला आहे, हे इतिहासातून कळते.
सावित्रीआई फुले विचार मंचावर यावेळी अॅड. प्रकाश मौर्य, अॅड. केसरी मौर्य, लालती शाक्य, मायाताई गोबरे, डॉ. दिलीप घावडे, किशोर भगत, प्रा. बाळकृष्ण सरकटे, अॅड. रामदास राऊत, ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. संचालन आणि आभार नम्रता खडसे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)