संविधान दिन विशेष; शिक्षकाने जपला संविधानप्रसाराचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:43 AM2019-11-26T11:43:26+5:302019-11-26T11:44:01+5:30
शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान.
प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्या संविधानाच्या आधारे भारताचा कारभार चालतो, त्या राष्ट्रीय ग्रंथाचे साधे दर्शनही अनेकांना घडलेले नाही. ते वाचणे, समजून घेणे तर दूरच. अशावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक सामान्य नागरिकाने संविधान वाचलेच पाहिजे, ही धडपड उराशी बाळगणाऱ्या शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान.
मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी भारतभरात संविधान दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त मजहर खान यांच्या उपक्रमाविषयी... ते दिग्रस येथील अंजुमन उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ‘संविधान भेट’ उपक्रम राबविणे सुरू केले आहे. शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या कोलुरा गावापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. दरवर्षी संविधान दिनी समाजिक संस्था, ग्रामपंचायती, शाळा, वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस ठाणे, नगरपरिषद, तहसील अशा कार्यालयांमध्ये भारतीय संविधानाची प्रत सन्मानपूर्वक सोपविली जाते. यंदाही ते शहरात संविधानाच्या प्रती वाटप करणार आहेत.
मुलीच्या लग्नातही संविधानाने स्वागत
मजहर खान संविधानदिनी तर हा उपक्रम राबवितातच, पण वर्षभरही संविधान प्रसाराचा त्यांचा प्रयत्न असतो. सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तींना त्यांच्या वाढदिवशी ते संविधान भेट देतात. अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडून संविधानाची भेट मिळाली आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत संविधान प्रत देऊन केले होते.
अनेक शासकीय कार्यालयात संविधान प्रत उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. शिवाय पुस्तकांच्या दुकानातही संविधान प्रत सहज व मोठ्या संख्येत उपलब्ध नसते. अनेक लोकांनी तर संविधान कसे आहे, हे पाहिलेलेसुद्धा नाही. त्यामुळे माझ्या परीने शक्य तितक्या लोकांपर्यंत संविधान पोचविण्याचा निर्धार केला.
- मजहर खान, शिक्षक, दिग्रस