भूखंड घोटाळ्यातील आरोपीच्या नावावर ५० लाखांची बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:16 PM2019-07-22T22:16:25+5:302019-07-22T22:16:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर तब्बल ५० लाख रुपयांची बांधकामे केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर तब्बल ५० लाख रुपयांची बांधकामे केली गेली. मात्र पोलिसांनी या आरोपीचे बँक खाते सील केल्याने या कामाची देयके काढताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. पैसे बुडतात की काय, म्हणून या पदाधिकाऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे.
भाजपचा हा पदाधिकारी दारव्हा तालुक्यातील आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील एका गावात हा पदाधिकारी ‘लोकप्रतिनिधी’ आहे. त्याची अर्धांगिणीही गावातील महत्वाच्या पदावर लोकप्रतिनिधी आहे. या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीकडेसुद्धा बांधकाम परवाना आहे. परंतु त्याची किंमत कमी आहे. शिवाय लोकप्रतिनिधीला स्वत:च्या नावावर काम करता येत नाही म्हणून या पदाधिकाºयाने यवतमाळच्या भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर सुमारे ५० लाख रुपयांची बांधकामे केली. आपले गाव व दारव्हा तालुक्यातील अनेक निविदा या आरोपीच्या नावावर भरल्या गेल्या. गेल्या वर्षभरात या पदाधिकाºयाचा हा डमी कंत्राटदाराचा ‘उपक्रम’ सुरू होता. घोटाळ्यातील आरोपी केवळ कागदावर कंत्राटदार होता. प्रत्यक्षात सर्व कामे तो पदाधिकारी वजा लोकप्रतिनिधीच करायचा. यानिमित्ताने लोकप्रतिनिधीच ठेकेदार बनल्याचा पुरावाही पुढे आला आहे.
यवतमाळात ‘लोकमत’ने कोट्यवधींचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला. ५० लाखांची बांधकामे नावावर असलेला युवक या घोटाळ्यात अडकला. एवढेच नव्हे तर गेली अनेक महिने जामीन न मिळाल्याने तो कारागृहात होता. तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपीचे बँक खाते सील केले. ते अद्यापही मोकळे केले गेले नाही. बँक खातेच सील असल्याने ५० लाखांची देयके वळती करावी कशी असा पेच त्या पदाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला होता. शिवाय दुसरे बँक खाते उघडावे तर आरोपी कारागृहात त्यामुळे कोंडीत सापडलेल्या या पदाधिकाºयाने अखेर आपल्या स्तरावरच ५० लाखांची ती देयके रोखून धरली. आता त्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाला. त्यामुळे हा पदाधिकारी आता बँकेत नवे खाते उघड म्हणून त्या आरोपीमागे तगादा लावत असल्याची माहिती आहे. ५० लाखांत बहुतांश देयके ही ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले जाते.
नवे बँक खाते उघडल्यास पोलिसांकडून काही अडचण निर्माण तर होणार नाही ना या दृष्टीनेही हा पदाधिकारी चाचपणी करीत आहे. कारण भूखंड घोटाळ्यातील या आरोपीने यवतमाळातील बँकांची फसवणूक केली आहे. बेवारस भूखंड परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या नावावर करून तो बँकेत तारण ठेवला गेला व त्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले गेले. बँका आता या आरोपीची व कुुटुंबीयांची इतर संपत्ती विकून कर्जाची वसुली करता येते का या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत आरोपीने दुसरे बँक खाते उघडले व त्यात बांधकाम देयकाचे ५० लाख रुपये जमा झाल्यास बँकांकडून ऐनवेळी पोलिसांच्या मध्यस्थीने या रकमेवरही दावा सांगितला जाण्याचा धोका आहे. त्यामुळेच भाजपचा तो पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी ५० लाखांची देयके काढून घेण्यासाठी अतिशय सावधगिरीने पावले टाकत असल्याची माहिती आहे.
सत्तेच्या मागे धाव : काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप
सध्या भाजपात असलेला हा लोकप्रतिनिधी सर्व प्रथम काँग्रेसमध्ये होता. दारव्हा या ‘गृह’ तालुक्याला त्यावेळी मिळालेल्या लालदिव्यामुळे त्याने काँग्रेसमध्ये वजन वाढविले. त्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होताच त्याने राष्ट्रवादीची साथ धरली. राष्ट्रवादीचा ज्वर ओसरला व भाजप-सेनेची सत्ता आली. गावाच्या या लोकप्रतिनिधीने पुन्हा पारडे बदलत भाजपचा झेंडा हाती घेतला. सध्या हा पदाधिकारी भाजपातच असला तरी भविष्यात सत्ता बदलताच पुन्हा भाजपाला हरि‘ओम’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.