बांधकाम अभियंत्यांना लागले पदोन्नतीचे वेध
By Admin | Published: April 1, 2017 12:40 AM2017-04-01T00:40:50+5:302017-04-01T00:40:50+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना बढत्यांचे वेध लागले आहे. कारण ५ एप्रिल रोजी पदोन्नती समितीची (डीपीसी)
बुधवारी ‘डीपीसी’ : अनेकांची मोर्चेबांधणी
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना बढत्यांचे वेध लागले आहे. कारण ५ एप्रिल रोजी पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होणार असून त्यात अभियंत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्ह्यात बांधकाम उपअभियंत्यांपैकी चार ते पाच जणांचा कार्यकारी अभियंता पदावरील पदोन्नतीच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय १८ कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून बढती दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपअभियंत्यांमध्ये पुसदचे रवींद्र मालवत, नेरचे तकी, पांढरकवड्याचे मनोहर सहारे तसेच यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सेवा दिलेले व सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे कार्यरत असलेल्या शेंडगे आदींचा समावेश राहू शकतो.
पुसदचे बांधकाम कार्यकारी अभियंता धोत्रे व एका भाजपा आमदाराचे बिनसले होते. त्यामुळे धोत्रे बदलीच्या मानसिकतेत होते. धोत्रे गेल्यास आपली पुसदला नियुक्ती करून घेण्याचे मालवत यांचे नियोजन होते. मात्र धोत्रेंची ‘तडजोड’ झाल्याने ते पुसदमध्येच रमले. त्यामुळे मालवत यांनी आता राष्ट्रीय महामार्ग क्र. २ अकोला येथे आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. तेथील कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण हेसुद्धा अधीक्षक अभियंता पदावरील बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही बढती मिळाल्यास त्यांचा यवतमाळसाठी ‘इन्टरेस्ट’ राहू शकतो. येथील अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के मंत्रालयात उपसचिव म्हणून परत जाणार असल्याची चर्चा बांधकाम खात्यात आहे. मिथिलेश चव्हाण यांना बढती मिळाल्यास मालवत यांचा अकोल्यातील मार्ग सूकर होऊ शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतही होणार बदल
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यकारी अभियंत्यांची सेवानिवृत्ती तोंडावर आहे. त्यामुळे या दोनही जागा रिक्त होणार आहे. त्यातील बांधकाम विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता पदावर मनोहर सहारे लक्ष ठेऊन आहे. बढती मिळाल्यास सहारेंचा बांधकाम १ मध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न राहू शकतो. बढतीच्या प्रतीक्षेतील अन्य काही अभियंतेसुद्धा आपल्या सोईच्या नियुक्तीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत आहे. त्यासाठी काहींनी राजकीय गॉडफादरचा आडोसा घेतला आहे.