महामार्गांची बांधकामे उपलब्ध मजुरांमध्ये सुरू; गावाकडे निघालेल्या परप्रांतीयांना थांबविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:29 PM2020-04-22T17:29:33+5:302020-04-22T17:29:58+5:30
शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे.
लॉकडाऊनमुळे थांबलेली बांधकामे आता पुन्हा सुरू झाली. या बांधकामांवर बहुतांश परप्रांतीय मजूर आहेत. परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीने बहुतांश मजुरांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर काही मजूर कामे सुरू असलेल्या कॅम्पमध्येच थांबले. आता या थांबलेल्या मजुरांच्या मदतीने रस्त्यांची बांधकामे केली जात आहे. आवश्यकतेच्या तुलनेत मजुरांची ही संख्या अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी आहे. ३ मेनंतर लॉकडाऊनची काय स्थिती राहील यावर परप्रांतीय मजुरांचे कामावर पुन्हा परतणे अवलंबून आहे.
‘शेल्टर होम’मधील मजुरांना बोलविणार
गावाकडे निघालेले अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडल असून ते सध्या शासनाच्या ‘शेल्टर होम’मध्ये आहेत. या मजुरांना रस्ते बांधकामावर बोलविण्याचा प्रयत्न होतो आहे. हाताला काम, रोजच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची चिंता मिटणार असल्याने अनेक मजूर कामावर येण्यास उत्सूक आहेत. परप्रांतीय मजूर येईपर्यंत स्थानिक मजुरांना घेऊन महामार्ग बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
ऑपरेटरअभावी मशिन्स आहेत उभ्या
बांधकामांवरील जेसीबी, पोकलॅन्ड, क्राँक्रीटीकरणाच्या मशिन्स ऑपरेटर गावाकडे निघून गेल्याने अनेक ठिकाणी उभ्या आहेत. आता स्थानिक पातळीवर पर्यायी ऑपरेटरचा शोध घेतला जात आहे. या बांधकामांवर ट्रान्सपोर्ट, सिमेंट व अन्य साहित्य उपलब्धतेचीही अडचण येत आहे.
सुरक्षेच्या सर्व उपायांचा दावा
एकट्या विदर्भात नागपूर-बोरी-तुळजापूर, नागपूर-बुटीबोरी-खापरी, नांदेड-हिंगोली, अकोला-नांदेड, वाशिम-हिंगोली अशा काही महामार्गांची कामे सुरू झाली. तेथे कोरोना सुरक्षेचे सर्व उपाय केले जात असून मास्क, सोशल डिस्टन्सिंगवर भर असल्याचा दावा केला जात आहे.
नागपूर-तुळजापूर मार्ग प्रगतीपथावर
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे महागावपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे असून वर्धा, यवतमाळपर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. महागाव ते वारंगा फाटा हा भाग ‘सद्भाव’ या कंपनीकडे असून तेथे जेमतेम २५ टक्के काम झाले आहे. ‘एनईपी’ या कंपनीकडे वारंगाफाटा ते तुळजापूर हे काम असलेतरी तेथे अद्याप एक टक्काही काम झाले नाही.
नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाचे बांधकाम उपलब्ध मजुरांवर सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जात आहे.
- रामअवतार त्यागी
एजीएम, दिलीप बिल्डकॉन