वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम

By Admin | Published: January 11, 2017 12:42 AM2017-01-11T00:42:01+5:302017-01-11T00:42:01+5:30

करंजी ते चंद्रपूर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने वणीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टोल नाक्याचे बांधकाम केले

Construction of unannounced toll in the forest | वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम

वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम

googlenewsNext

वसुली सुरू : प्रकरण पोहोचले सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दरबारात
वणी : करंजी ते चंद्रपूर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने वणीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टोल नाक्याचे बांधकाम केले असून त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयात पालिकेने संबंधित कंपनीशी अनेकदा पत्र व्यवहार केला. मात्र कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात पोहचले आहे. त्यामुळे या विषयात काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
करंजी ते चंद्रपूर व्हाया वणी या रस्त्याच्या कामाचे कंत्राट चंद्रपूर येथील आयव्हीआरसीएल या कंपनीकडे आहे. या कंपनीने वरोरा मार्गावरील रेल्वे गेट ते लालगुडा रस्त्यावर टोल नाका उभारला आहे. सदर मार्ग वणी नगरपरिषदेच्या हद्दीतून जात असल्यामुळे व वणी हद्दीत टोल नाका उभारताना कंपनीने पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होती. मात्र सदर कंपनीने बांधकाम करताना अशी कोणतीही परवानगी घेतली नाही. परिणामी वणी पालिकेला अडीच लाख रुपयांचा करापोटी फटका बसला. त्यापेक्षाही गंभीर बाब ही की, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कंपनीने भोगवटा प्रमाणपत्रदेखील घेतले नाही. अशाही परिस्थितीत संबंधित कंत्राटदाराने टोल टॅक्स वसुली सुरू केली आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पी.के.टोंगे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.
हा मार्ग महाराष्ट्र शासनाच्या निधीतून बांधण्यात आला आहे. कार तथा लहान चार चाकी वाहनांना येथे टोल टॅक्स लागू नाही. त्यामुळे अशा वाहनांना तेथून जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने हा रस्ता ड्रम आडवे टाकून बंद केला आहे. त्यामुळे टोल फ्री वाहनांचा खोळंबा होत आहे. हा रस्ता बंद करण्याची परवानगी कंत्राटदाराला कुणी दिली, असा सवाल तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे.
या संदर्भात नगरपालिेकेने आयव्हीआरसीएल कंपनीच्या व्यवस्थापकांना १८ मार्च २०१६ ला पत्र लिहून बांधकाम परवानगी घेण्याबाबत कळविले. मात्र कंपनीने बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रेच सादर केली नाहीत. त्याबाबतही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कंपनीला कळविले. मात्र अद्यापही कंपनीने कागदपत्रांची पूर्तता केली नाही.

कंपनी म्हणते, आम्ही प्रक्रिया पूर्ण करायला तयार
वणी नगरपालिकेने कंपनीला नोटीस बजावल्यानंतर कंपनीने पत्राद्वारे आपली बाजू मांडली. टोल प्लाझाचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घ्यावी लागते, ही बाब आम्हाला माहित नव्हती. मात्र सदर बांधकाम पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आले, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे. या उपरांतही परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सोपस्कर पूर्ण करण्यास कंपनी तयार आहे, असे कंपनीने पत्रातून स्पष्ट केले आहे. या पत्रानंतर वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा पत्र पाठवून कोणकोणती कागदपत्रे सादर करायची, ते कळविले. मात्र अद्यापही कंपनीने वणी नगरपालिकेकडे कागदपत्रे सादर केली नाहीत.

 

Web Title: Construction of unannounced toll in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.