बांधकामचा कारभार ढेपाळला
By admin | Published: July 18, 2016 12:47 AM2016-07-18T00:47:54+5:302016-07-18T00:47:54+5:30
कंत्राटदारांची देयके रखडलीयवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे.
जिल्हा परिषद : कंत्राटदारांची देयके रखडलीयवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकचा कारभार चांगलाच ढेपाळला आहे. अनेक कंत्रादारांची देयके रखडल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत बांधकाम विभाग क्रमांक एक आणि दोन कार्यरत आहे. यापैकी बांधकाम क्रमांक एकचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. या विभागामार्फत अनेक ठिकाणी रस्ते आणि विविध विकास कामे केली जातात. मात्र कामे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना देयक मिळण्यास प्रचंड विलंब होतो. मोठी देयके काढण्यास तेवढा विलंब होत नाही. मात्र लहान विकास कामांची देयके काढण्यास चांगलाच वेळ लागत असल्याने छोटे कंत्राटदार संकटात सापडले आहेत.
विविध विकास कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचे मोजमाप केले जाते. त्यानुसार देयक काढण्याची पुढील प्रक्रिया सुरू होते. मात्र या विभागातून मोजमाप पुस्तिकाच गायब झाल्याचे सांगण्यात येते. तब्बल ५० च्यावर कामांच्या मोजमाप पुस्तिका कार्यालयातून गहाळ झाल्याने देयक काढण्याची प्रक्रियाही खोळंबली. कंत्राटदार मात्र सतत देयकासाठी तगादा लावत होते. त्यामुळे मोजमाप पुस्तिका शोधण्याचे मोठे आव्हान या विभागासमोर होते. त्यापैकी काही मोजमाप पुस्तिका हस्तगत करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि अद्याप किमान ३० च्यावर कामांच्या मोजमाप पुस्तिका गायबच असल्याची माहिती आहे.
बांधकाम विभागातून मोजमाप पुस्तिका गायब होऊनही हा विभाग प्रचंड सुस्तच दिसून येत आहे. संबंधित शाखा अभियंता, उपअभियंता आदी अत्यंत उदासीन दिसत आहे. वरिष्ठही अद्याप मूग गिळूनच आहे. दरम्यान मोजमाप पुस्तिका हस्तगत करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यातूनच काही मोजमाप पुस्तिका परत मिळविण्यात या विभागाला यश आल्याची माहिती आहे.
मात्र उर्वरित पुस्तिका हाती लागत नसल्याने हा विभागच गोंधळून गेला आहे. नेमके काय करावे, असा प्रश्न विभागाला पडला आहे. यावरून या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. (शहर प्रतिनिधी)