काँग्रेस-राकाँ सेनेच्या संपर्कात

By admin | Published: February 25, 2017 12:52 AM2017-02-25T00:52:49+5:302017-02-25T00:52:49+5:30

जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Contact with Congress-RAC | काँग्रेस-राकाँ सेनेच्या संपर्कात

काँग्रेस-राकाँ सेनेच्या संपर्कात

Next

जिल्हा परिषद : सत्तेसाठी मोर्चेबांधणी, शिवसेना म्हणते, सर्व पर्याय खुले
यवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २० जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सत्तेत वाटेकरी होण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शिवसेनेशी संपर्क प्रस्थापित केला आहे. दरम्यान युती व सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याची घोषणा शिवसेनेने केल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची व्युहरचना असल्याचे दिसते.
जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळाल्या. सेना, भाजपात अवघ्या दोन जागांचे अंतर आहे. भाजपाने १८ जागा मिळविल्या आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी ११ जागांवर आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, भाजपाची सत्ता येईल, असे अंदाज बांधले जात असले तरी शिवसेना मात्र वेगळ्या वाटेने जाण्याची चाचपणी करीत आहे. राज्यात युती तुटली असल्याने सत्तेसाठी भाजपाला सोबत घेणे बंधनकारक नसल्याचे सुतोवाच शिवसेनेने केले आहे. त्याचवेळी सत्ता स्थापनेसाठी शिवसेने सोबत येण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीने दर्शविली आहे. त्यासाठी सेना नेत्यांशी या पक्षांनी संपर्कही केला. स्थानिक वर्चस्वाच्या राजकारणातून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेच्या येथील नेत्यांचा अजेंडा असला तरी ‘मातोश्री’वरून काय आदेश येतात, यावर पुढील वाटचाल अवलंबून आहे. सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्या निर्णयानंतरच सत्तेचे समीकरण मांडले जाणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नेमके कुणाला याचा निर्णय संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असेही सेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेतील पदांवर वर्णी लावून घेण्यासाठी सेनेच्या अनेक सदस्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत फिल्डींग लावली आहे.
भाजपाचे ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’
निकालाच्या दुसऱ्याच दिवशीपासून शिवसेनेने सत्ता स्थापनेचा विचार सुरू केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या आॅफरवरही चिंतन केले जात आहे. भाजपात मात्र चार वरून १८ जागांवर झेप घेऊनही अद्याप शांतता आहे. आत्ताच निवडून आलो, २० मार्च अजून दूर आहे, असे सांगून भाजपा नेत्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत काही निर्णय होतो का आणि पक्ष स्तरावरुन काही आदेश येतात का याकडे भाजपा नेत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी फार घाई नाही, असेच संकेत भाजपा नेत्यांच्या देहबोलीवरून मिळत आहे. शिवसेनेने भाजपाची साथ घेतल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अध्यक्षपदाचा मान कुण्या तालुक्याला?

जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. मात्र या अध्यक्षपदाचा मान नेमक्या कोणत्या तालुक्याला मिळणार याची चर्चा राजकीय गोटात आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघातील तीनही तालुक्यातील सर्व ११ जागा शिवसेनेकडे खेचून आणल्या. त्यामुळे अध्यक्षपदाचा मान या पैकीच एखाद्या तालुक्याला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातही दिग्रस व नेरला बॅलन्स करण्यासाठी दारव्हा तालुक्यावर अधिक जोर राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यास भाजपा उपाध्यक्ष पदावर दावा सांगेल. हे उपाध्यक्षपद जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या यवतमाळ मतदारसंघात आणि तेही पुरुषाकडे राहण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उपाध्यक्षपद यवतमाळ मतदारसंघात राहिल्यास या तालुक्याला सभापतीपद मिळण्याची शक्यता कमी राहू शकते.

 

Web Title: Contact with Congress-RAC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.