चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 02:01 PM2021-12-10T14:01:56+5:302021-12-10T14:19:43+5:30

पांढरकवडालगतच्या मराठवाकडी गावाजवळ औषधांनी भरलेला कंटेनर चोरट्यांनी लुटला. लुटारुंनी कंटनेर चालकाचे हातपाय बांधून त्यांना शेतात फेकले व त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू फरार झाले.

a container carrying medicines stock robbed by thieves near pandharkawada | चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

Next
ठळक मुद्देकंटेनरमधील दोघांना हातपाय बांधून शेतात फेकलेमराठवाकडीलगत थरार लाखोंची औषधी पळविली

यवतमाळ : हैदराबादवरून औषधांचे बॉक्स घेऊन नागपूरकडे निघालेला कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर लुटण्यात आल्याची थरारक घटना पांढरकवडालगत असलेल्या मराठवाकडी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली.

लुटारूंनी यावेळी कंटेनरमध्ये असलेल्या दोनही चालकांचे हातपाय बांधून त्या दोघांना शेतात फेकले. त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून हे लुटारू फरार झाले. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कंटेनरमधून नेमका किती औषधसाठा लंपास झाला, याचे मोजमाप सायंकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, औषध कंपनीचे अधिकारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यानंतर तो ट्रक कंटेनरसमोर थांबला. त्यामुळे कंटेनरच्या चालकानेही आपले वाहन थांबविले. याचवेळी मागून एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन आले. त्यातून तीन ते चार लुटारू खाली उतरले. त्यांनी चालकांना बांधून कंटेनर पळवून नेला. काही वेळानंतर चालकांनी कशीबशी स्वत:ची सुटका करत या घटनेबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाही या घटनेबाबत अवगत केले. 

लुटण्यात आलेला कंटेनर पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, त्यातील नेमका किती औषधसाठा लुटारूंनी लंपास केला, याची मोजदाद सायंकाळपर्यंत सुरू होती. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्यासह एलसीबी व सायबर सेलचे पथक पांढरकवडात दाखल झाले. लुटारू नेमक्या कोणत्या मार्गाने पसार झाले, याची माहिती घेणे सुरू असून अद्याप लुटारूंचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या घटनेचा तपास पांढरकवडाचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय महल्ले, पोलीस शिपाई वसंत चव्हाण, शंकर बोरकर करीत आहेत.

अशी केली सिनेस्टाइल लूट

लुटारूंनी कंटेनरच्या केबिनचा ताबा घेत, कंटेनरमध्ये बसून असलेल्या लखन जसराम जाटाव (वय २४, रा. कालोडी, मध्य प्रदेश) व बलीचंद सेन (रा. मध्य प्रदेश) या दोघांच्याही डोळ्यावर जबरदस्तीने पट्ट्या बांधल्या. त्यानंतर या दोघांनाही कंटेनरच्या खाली उतरवून लगतच्या शेतात नेण्यात आले. तेथे त्यांचे हातपाय बांधले.
 

अर्धा किमी अंतरावर दुसऱ्या ट्रकमध्ये भरली औषधे

लुटारूंपैकी दोघे या चालकांजवळ जवळपास अर्धा तास थांबून होते. यादरम्यान उर्वरित लुटारूंनी औषधाने भरलेला कंटेनर तेथून पाच किलोमीटर अंतरावर पुढे असलेल्या कोंघारा या गावालगत नेला. तेथे कंटेनर थांबवून त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून नंतर लुटारूंनी तेथून पलायन केले.

महामार्गावरील महिनाभरातील लुटमारीची दुसरी घटना

गेल्या महिनाभरातील या मार्गावर घडलेली ही लुटमारीची दुसरी घटना आहे. तीन आठवड्यांपूर्वी रात्रीच्या वेळी करंजी मार्गावरील साखरा गावालगत एका ट्रकचालकाला अशाच पद्धतीने हातपाय बांधून शेतात सोडण्यात आले. त्यानंतर लुटारूंनी त्या ट्रकची सहा चाके पळवून नेली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावर लुटारूंची दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: a container carrying medicines stock robbed by thieves near pandharkawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.