हॉटस्पॉट झोनला दूषित पाण्याचा विळखा घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:11+5:30

हॉटस्पॉट झोनमध्ये मेमन कॉलनी, सव्वालाखे ले-आऊट, नागसेन सोसायटी, बिलालनगर, इंदिरानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, डेहनकर ले-आऊट यासह भोसा रोड आणि पांढरकवडा रोडवरील परिसराचा समावेश आहे. या भागात मागील महिनाभरापासून नळाला दूषित पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसाआड नळ सोडले जाते. काही भागात तर बारावा दिवस उजाडतो. इतके दिवस पाणीपुरविणे अवघड जाते.

Contaminated water seeps into the hotspot zone | हॉटस्पॉट झोनला दूषित पाण्याचा विळखा घट्ट

हॉटस्पॉट झोनला दूषित पाण्याचा विळखा घट्ट

Next
ठळक मुद्देसांगून सांगून थकले : प्राधिकरणाची ‘सोय’ प्रशासनालाच लावावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असलेल्या हॉटस्पॉट झोनचा दूषित पाण्याचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. नागरिक, नगरसेवक आदींनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हा प्रश्न मांडला. सांगून सांगून थकलेल्या या लोकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. प्राधिकरणाची ‘सोय’ तुम्हीच लावा, अशी विनंती करण्यात आली.
हॉटस्पॉट झोनमध्ये मेमन कॉलनी, सव्वालाखे ले-आऊट, नागसेन सोसायटी, बिलालनगर, इंदिरानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, डेहनकर ले-आऊट यासह भोसा रोड आणि पांढरकवडा रोडवरील परिसराचा समावेश आहे. या भागात मागील महिनाभरापासून नळाला दूषित पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसाआड नळ सोडले जाते. काही भागात तर बारावा दिवस उजाडतो. इतके दिवस पाणीपुरविणे अवघड जाते. अशातच दूषित पाण्याचा डोज शरीरात घ्यावा लागतो.
या भागात एका ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. तेथून अशुद्ध पाणी शिरून नळाला येत असावे, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी यावर उपाय शोधला नाही. रविवार आणि सोमवारी नळ सोडण्यात आले. नालीच्या पाण्यापेक्षाही खराब पाणी नागरिकांना भरावे लागले. पिवळे पाणी तर या भागातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजले आहे.
कोरोनामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीत आहे. कुठलाही आजार होवू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता त्यांच्याकडून घेतली जात आहे. परंतु नळाचे पाणी आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे या भागातील नागरिकांनी हा प्रश्न मांडला. त्यांनीही या गंभीर विषयाविषयी चिंता व्यक्त केली. प्राधिकरणाच्या अधिकाºयांना सूचना केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र मंगळवारपर्यंत लिकेज पाईप दुरुस्त झाला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनीच हा प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा आहे.

हातपंप बंद झाल्याने गैरसोयी वाढल्या
हातपंपामुळे हॉटस्पॉट झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे सांगत या भागातील हातपंप बंद करण्यात आले. एकीकडे नळ ८ ते १२ दिवसाआड येतात. दुसरीकडे दूषित पाणी मिळते. अशातच बंद झालेल्या हातपंपामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. उकाडा सहन करत दिवस काढावा लागतो. पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते. काही भागात तर पूर्वी नियमितपणे येणारे विकतचे पाणीही पोहोचत नाही. नाईलाजाने त्यांना दूषित पाणी वापरावे लागत आहे. रमजानचा महिना आहे. पाणी उपलब्ध नाही. अशावेळी टँकरचा पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जीवन प्राधिकरणाच्या पाणी वितरणासंदर्भात असंख्य तक्रारी वारंवार येत आहेत. यासंदर्भात प्राधिकरणाला पत्र देवून कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतरही त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठांकडेच हा विषय मांडला जाईल.
- एम.डी. सिंह,
जिल्हाधिकारी, यवतमाळ

भोसा रोड परिसराला पाणीपुरवठा होत असलेले पाईप खूप जुने, गंजलेले आहेत. नळ सोडल्यानंतर पाईपचा गंज पाण्याद्वारे निघून पाणी अस्वच्छ होते. मात्र काही वेळपर्यंतच असे पाणी नळाला येते. दूषित पाण्याचा पुरवठा होत नाही. पिवळे पाणी राहू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
- अजय बेले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ

Web Title: Contaminated water seeps into the hotspot zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी