पुसद येथे धनगर समाजाची चिंतन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:11+5:302021-07-30T04:44:11+5:30
पुसद : येथील एका मंगल कार्यालयात धनगर समाजाची चिंतन बैठक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषराव बोडखे यांच्या अध्यक्षतेखाली पार ...
पुसद : येथील एका मंगल कार्यालयात धनगर समाजाची चिंतन बैठक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषराव बोडखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून चिंतन बैठकीला सुरुवात झाली. प्रमुख वक्ते म्हणून समाजाचे गाढे अभ्यासक प्रा. यशपाल भिंगे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, प्रा. सुरेश गोफणे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. सचिन नाईक, यशवंत सेना विदर्भप्रमुख अशोकराव नाईक, विनोद सरगर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक उपस्थित होते.
प्रा. यशपाल भिंगे यांनी समाजातील परंपरागत चालीरिती, होळकर शाहीतील इतिहासाचे पुरावे तसेच पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या काळातील गड, किल्ले, बारव यांचे सवर्धन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच समाजातील गरीब, दुर्लक्षित घटकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे. जोपर्यंत एकीचा नारा समाजापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत समाजाच्या कोणत्याच अडचणी व समस्या सुटणार नाहीत, असे स्पष्ट केले. भविष्यात संघर्ष करावा लागेल. त्यासाठी समाजाने तयार राहावे, असे आवाहनही केले.
यावेळी ॲड. सचिन नाईक, सदबाराव मोहटे, अशोकराव नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटन आणखी मजबूत करण्याची गरज, तसेच समाजातील उच्चशिक्षित मुलांसाठी युपीएससी, एमपीएससी उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र मार्गदर्शन संस्था शासनाने मंजूर करावी, याबाबत ऊहापोह करण्यात आला. संचालन महेश पाल, तर आभार प्रदीप मोहटे यांनी मानले.