संघटित गुन्हेगारीवर चिंतन
By Admin | Published: August 18, 2016 01:10 AM2016-08-18T01:10:15+5:302016-08-18T01:10:15+5:30
यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी कारवायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस दलात या कारवायांबाबत चिंतेचे वातावरण दिसत आहे.
शहर पोलीस दलाची आज बैठक : एसपी देणार प्रतिबंधात्मक कारवाईच्या टिप्स्
यवतमाळ : यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी कारवायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस दलात या कारवायांबाबत चिंतेचे वातावरण दिसत आहे. ही गुन्हेगारी कशी मोडून काढायची यावर शहर पोलीस दल गुरुवारी चिंतन करणार आहे.
१८ आॅगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शहर पोलीस दलाची बैठक बोलविली आहे. यवतमाळ शहर, वडगाव रोड ठाणेदार, एसडीपीओ, एलसीबी, एटीएस, डीएसबी, अॅन्टी गँग सेल अशा सर्व संबंधितांची ही बैठक होत आहे. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, आगामी गणेशोत्सव, त्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरदिवसा होत असलेल्या चोरी, घरफोडीच्या घटना, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण, दारू-जुगार आणि छुटपुट कारवाईला ‘कामगिरी’ दाखविण्याचे वाढते प्रकार अशा सर्वच मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. एसपी या सर्व मुद्यांवर आणि विशेषत: संघटित गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी मोक्का, एमपीडीए, तडीपारी या सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचविणार असल्याची व त्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. राजकीय पाठबळामुळे या टोळ्या आणखी सशक्त झाल्याचे दिसत आहे. राज्यात युतीची सत्ता आल्याने एक गट अचानक सक्रिय झाला आहे. या गटाला भाजपाचे पाठबळ असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. गुन्हेगारी वर्तुळातील दुसरा गटही तेवढाच सक्रिय आहे. या गटाला काँग्रेसचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारी वर्तुळातील म्होरक्यांना राजकीय पाठबळ असल्याने कारवाई करताना पोलिसांनाही मर्यादा पडतात. पोलिसातील काहींची राजकीय उठबस असल्याने त्यांनासुद्धा कारवाई करताना हे सलोख्याचे संबंध अडचणीचे ठरतात.
या सर्व कोंडीतून मार्ग काढून यवतमाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांना पेलायचे आहे. गुन्हेगारी टोळ्या डोकेवर काढणार नाही याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. शिवाय आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या दृष्टीनेसुद्धा आतापासूनच शांततेसाठीच्या उपाययोजना हाती घेण्याची तयारी पोलीस दलात सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तीन जेष्ठ ठाणेदार बढतीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोले, दारव्ह्याचे अनिलसिंह गौतम, घाटंजीचे शिवा ठाकूर हे एसडीपीओ पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असले तरी त्यांना संधी मिळते की नाही याबाबत साशंकता आहे. शासनाने १४३ जागांची यादी काढल्यास या अधिकाऱ्यांची बढती निश्चित मानली जाते. मात्र हीच यादी ५५ ते ६० ची निघाल्यास या अधिकाऱ्यांची संधी हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच निसार तडवी हेसुद्धा बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
पुसद, दारव्हा, गृह विभागाला एसडीपीओंची प्रतीक्षा
जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सहा जागा आहेत. त्यापैकी तीन रिक्त आहेत. पुसद येथे वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर तर दारव्हा येथे ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्याकडे तेथील एसडीपीओंचा अतिरिक्त प्रभार आहे. तेथील अश्विनी पाटील, कल्पना भराडे यांच्या बदल्या झाल्याने एसडीपीओंच्या जागा रिक्त आहेत. गृह पोलीस उपअधीक्षकाचा प्रभार कर्मचारी कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्याकडे आहे. ३१ आॅगस्ट रोजी वणीचे एसडीपीओ माधव गिरी सेवानिवृत्त होणार आहे. त्यांची जागा यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने घेतील. त्यामुळे येथील एसडीपीओंची जागा रिक्त होणार आहे.
सोलापूरचे विशाल नेहूल पांढरकवड्याचे नवे एसडीपीओ
शासनाने मंगळवारी एमपीएससीद्वारे थेट भरती झालेल्या आणि परिविक्षाधीन सेवा पूर्ण केलेल्या ३५ पोलीस उपअधीक्षकांना नियमित पदस्थापना दिली आहे. त्यात पांढरकवडा येथे एसडीपीओ म्हणून विशाल वसंत नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली. ते सोलापूर ग्रामीणवरून येत आहेत. पांढरकवड्याचे विद्यमान एसडीपीओ साहेबराव जाधव यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले असून लवकरच त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश जारी केले जाणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस पोलीस निरीक्षकांच्या उपअधीक्षक पदावरील बढतीची यादी जारी केली जाणार आहे. त्यात पुसद, यवतमाळ, दारव्हा, गृह येथे उपअधीक्षक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यवतमाळ एसडीपीओ पदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.