सतत धूर अन् धूळ; जगात होणाऱ्या तिसऱ्या आजाराचा जिवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:30 PM2024-12-02T18:30:20+5:302024-12-02T18:32:21+5:30
Yavatmal : शेतात काम करणारे, कंपनीतील कामगार या सर्वांनाच घेतोय विळख्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फुफ्फुसाचा आजार ही जागतिक समस्या बनली आहे. धूळ आणि धुरीमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. यासोबतच शेतशिवारात काम करणारा घटकही धूर आणि धुळीमुळे धोकादायक वातावरणात आहे. प्रत्येकानेच योग्य खबरदारी घेऊन या आजारापासून स्वतःची रक्षा करणे गरजेचे झाले आहे.
सतत कंपनीमध्ये काम करणाऱ्यांनी मास्क वापरा, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, ग्रामीण भागात निर्धूर चुलीचा वापर करावा, शेतातील पिकांची मळणी, सोंगणी करतानाही खबरदारी घ्यावी. प्रदूषण, धूर आणि धूळ यामुळे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सतत बदल होत असतो. सुरुवातीला हा बदल जाणवत नाही. नंतर मात्र दम लागणे, वातावरण बदलाचा परिणाम होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा स्थितीत फुफ्फुसाची ५० टक्के कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन तपासणी करत औषधोपचार घ्यावा, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
'सीओपीडी'ने जग हैराण !
फुफ्फुसाचा हा आजार आता जागतिक स्तरावर पसरला आहे. मोठे महानगर असो की, आडवळणावरचे गाव दोन्ही ठिकाणी धोका सारखाच आहे
सीओपीडी आजार कशामुळे होतो?
सतत प्रदूषित हवा, धूर, धूळ आणि सिगारेट, बीडीचे व्यवसन या सर्वांमुळे सीओपीडी हा आजार होण्याची दाट शक्यता असते
संगणक तपासेल फुफ्फुसांची क्षमता
पीएफटी म्हणजे कॉम्प्युटराइज पल्मनरी फंक्शनल टेस्ट केल्याने सीपीओडीचे निदान करता येते.
दुकानदार, विक्रेते, चालकांना धोका
रस्त्यावर धूळ उडत असते. वाहनांचा धूर असतो. याचा परिणाम दुकानदार, विक्रेते व वाहनचालकांनाही होतो. त्यांनाही धोका कायम आहे.
चाळिशीनंतर फुफ्फुसं तपासा
चाळिशीनंतर फुफ्फुसाची कार्यक्षमता कॉम्प्युटराइज पल्मनरी फंक्शनल टेस्टच्या माध्यमातून तपासणी आवश्यक आहे.
लक्षणं दिसताच करावी तपासणी
"फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाही. त्रास होतो, तेव्हा हा आजार तिसऱ्या स्टेजपर्यंत गेलेला असतो. थोडीही लक्षणं असल्यास तपासणी करून घ्यावी."
- डॉ. रवींद्र राठोड, श्वसन रोग तज्ज्ञ
सिगारेट पिण्याइतका भयंकर, चिवट !
- महिला ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करतात. कोंदट ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था असते.
- चुलीतून निघणारा धूर महिलांसाठी सिगारेट पिण्याइतकाच धोकादायक असतो. त्याचा परिणाम फुफ्फुसावर होत राहतो.