कंत्राटदार, तहसीलदाराची पुसद पोलिसात तक्रार

By admin | Published: March 18, 2017 12:52 AM2017-03-18T00:52:41+5:302017-03-18T00:52:41+5:30

नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील टाळकी येथील रेती कंत्राटदार रिहान बाबू खान फारुखी, माहूरचे तत्कालीन तहसीलदार व ....

Contractor, Tehsildar's Pusad police complaint | कंत्राटदार, तहसीलदाराची पुसद पोलिसात तक्रार

कंत्राटदार, तहसीलदाराची पुसद पोलिसात तक्रार

Next

दिग्रसचा फिर्यादी : माहूरसह पाच तालुका रेती घाटात उत्खनन
पुसद : नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील टाळकी येथील रेती कंत्राटदार रिहान बाबू खान फारुखी, माहूरचे तत्कालीन तहसीलदार व नांदेडच्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याविरुद्ध अवैध रेती उत्खनन प्रकरणात पुसद शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
फारुखी यांनी लाखो रुपयांच्या रेतीची चोरी केली व तत्कालीन तहसीलदार, खनिकर्म अधिकाऱ्यांनी त्यांना या कामात मदत केली, असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. दिग्रस येथील गुलाबनगर भागात राहणारे विशाल शाम सगने यांनी ही फिर्याद १५ मार्च रोजी नोंदविली आहे. त्या अनुषंगाने पुसद पोलिसांनी तपास चालविला आहे. या तक्रारीनुसार, रिहान फारुखी हे माहूर, किनवट, आर्णी, महागाव, घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करतात. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात रेती उत्खनन व पुरवठा ते करतात. सध्या त्यांनी काही घाट दुसऱ्याच्या नावावर घेतल्याचा आरोप आहे. चलानवर नाव एकाचे आणि स्वाक्षरी रिहान फारुखी यांची असा प्रकार सुरू असल्याचे पुरावेही सगने यांनी दिले आहेत. सगने यांचा रिहान फारूखींच्या अवैध रेती उत्खनन, चोरी व तस्करी प्रकरणात गेल्या चार-पाच वर्षांपासून लढा सुरू आहे.
पैनगंगा नदीत सुमारे ८० किलोमीटरपर्यंत हे रेती उत्खनन फारूखी मार्फत सुरू आहे. त्यांच्या या रेती चोरीला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महसूल अधिकाऱ्यांचे तसेच खनिकर्म विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप आहे. विदर्भ-मराठवाडा सीमावर्ती भागातील अनेक महसूल अधिकारी-कर्मचारी रिहान फारूखी यांच्या पे-रोलवर असल्याचा आरोपही केला जात आहे. या प्रकरणात पुसद पोलीस आता काय गुन्हा दाखल करतात याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय चमू)
नागपूर उच्च न्यायालयात याचिका
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातसुद्धा सगने यांनी याचिका दाखल केली होती. किनवटच्या आयएएस एसडीओच्या नेतृत्वातील समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मात्र त्यांचा चौकशी अहवाल मॅनेज असल्याचा आरोप करीत सगने यांनी या चौकशीला सुरूंग लावणारे पुरावे उच्च न्यायालयात सादर केले. गेल्या दहा महिन्यांपासून उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी तारीख मिळत असल्याने सगने हताश झाले आहे.

रिहान फारूखी यांच्यासोबत विशाल सगने यांची सन २०१४ मध्ये रेती घाटाची भागीदारी होती. सगने यांनी फारूखी यांना १८ लाख रुपये दिले. ही रक्कम परत न मिळाल्याने सगने यांनी फारूखी विरोधात मोहीम उघडली आहे.
सगने यांना आरटीआयअंतर्गत माहिती न दिली गेल्याने राज्य माहिती आयोगात नांदेडच्या खनिकर्म अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड ठोठावून शिस्तभंगाची कारवाईही केली होती.
रेती घाटात भागीदारीच्या अनुषंगाने गुंतविलेले १८ लाख रुपये परत मिळावे म्हणून सगने यांनी पुसद येथे रिहान फारूखी यांच्याविरोधात दिवाणी दावाही दाखल केला आहे.
सगने यांच्या तक्रारीवरून रिहान फारूखीविरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही सन २०१५ मध्ये दाखल करण्यात आला होता. रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक पकडून पंचनामा केला गेला. मात्र त्यानंतरही या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी महसूल यंत्रणेने त्यांना रेती घाट लिलावात आणखी मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Contractor, Tehsildar's Pusad police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.