कंत्राटी कर्मचारी कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:31 PM2018-02-27T23:31:23+5:302018-02-27T23:31:23+5:30
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेरनियुक्तीसाठी निवड चाचणी घेण्याचे आदेश धडकले आहे. राज्य शासनाच्या या आदेशाविरोधात आवाज उठवित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. अद्यादेश रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे मंगळवारी शासकीय कामकाज पूर्णत: ठप्प झाले.
शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात मंगळवारपासून राज्यभर कामबंद आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवारी स्थानिक आझाद मैदानावरून शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध निषेध फलक उंचावून शासकीय धोरणावर संताप नोंदविला.
विविध विकासकामांना गती देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी असताना त्यांना पदावरून कमी करण्याचा हा नवा फंडा असल्याचा आरोप कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हरियाणा सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेतले. त्याच धर्तीवर इतर कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याची गरज आहे. कंत्राटी कर्मचाºयांना नोकरीत काढल्यास त्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवणार आहे. वय वाढल्याने इतरत्र नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी शासकीय अद्यादेश रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे. कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.