नोंदणी विवाहात ‘लव्ह मॅरेज’वाल्यांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:21+5:30
शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे गेल्या दोन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन मनांच्या नात्याला कोणत्याही शासकीय दाखल्याची गरज नसतेच. पण विवाहाचे नाते नोंदणीकृत झाले की, पुढच्या जीवनालाही प्रेमासोबतच अधिकृततेची मोहोर लागते. त्यामुळे सुशिक्षित पिढी सध्या रजिस्टर्ड मॅरेज करण्याकडे वळत आहे. यातूनच जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात तब्बल ९७६ विवाह रजिस्टर्ड पद्धतीने झाले. यात लव्ह मॅरेजवाल्यांचे योगदान अधिक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे गेल्या दोन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
२०१७ पर्यत नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांची संख्या जिल्ह्यात नगण्य होती. मात्र नोव्हेंबर २०१७ पासून रजिस्टर्ड मॅरेजची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करताच नोंदणी विवाहांना प्रतिसाद वाढू लागला. २०१८ मध्ये तब्बल ४८० विवाह नोंदणी पद्धतीने झाले. तर २०१९ मध्ये हा आकडा आणखी वाढून ४९६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले.
१४ फेब्रुवारीला ३ विवाह
अनेकांनी व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून विवाहाचा मुहूर्त ठरविला आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारीला शहरातील मंगलकार्यालये ‘बुक’ आहेत. तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ३ रजिस्टर्ड मॅरेज होऊ घातले आहेत. हा आकडे वाढूही शकतो, असे विवाह अधिकारी तथा उपनिबंधक वसंत कळंबे यांनी सांगितले. शिवाय, गेल्या दोन वर्षांपासून दररोज २ ते ३ विवाह नोंदणी पद्धतीने होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल
शहरालगतच्या पर्यटनस्थळावर यानिमित्ताने खास तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये आॅक्सीजन पार्क, बोरगाव डॅम आणि चौसाळा टेकडी या सारख्या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय काही हॉटेल चालकांनीही या दिवसानिमित्त खास सजावट केली आहे. एकूणच प्रेम दिवस बहरलेला पहायला मिळणार आहे. याशिवाय गार्डन आणि इतर ठिकाणावरही युवकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबादवरुन दोन हजार गुलाबांची आयात
यावर्षी व्हॅलेन्टाईन-डेकरिता डच गुलाबाची मागणी परजिल्ह्यातून करण्यात आली आहे. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी झाल्याने फुलांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे शुक्रवारी एका गुलाबाच्या फुलाकरिता प्रेमीजणांना ४० रुपये मोजावे लागणार आहे. व्हॅलेन्टाईन-डेकरिता फुलांची दुकाने खास सजली आहे. फुलांची मागणी लक्षात घेता आठ दिवसापूर्वीच डच गुलाबाची मागणी नोंदविण्यात आली. एकाच ठिकाणावरून मागणीची पूर्तता न झाल्याने विविध जिल्ह्यातील हे गुलाब मागविण्यात आले आहे. यामध्ये पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.