दानातील जागेवर मुलाचा ताबा
By admin | Published: January 25, 2017 12:38 AM2017-01-25T00:38:40+5:302017-01-25T00:38:40+5:30
तालुक्याचे तत्कालिन नेते आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्व नारायणराव पाटील वानखेडे यांनी दान दिलेल्या खरूस येथील जागेवर मुलाने ताबा बसविला
गावकऱ्यांचा आरोप : खरूस येथील जमिनीचेप्रकरण
उमरखेड : तालुक्याचे तत्कालिन नेते आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्व नारायणराव पाटील वानखेडे यांनी दान दिलेल्या खरूस येथील जागेवर मुलाने ताबा बसविला असून यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना तडा जात आहे. भाजपा तालुकाध्यक्षांनी केलेल्या या कृतीचा एका पत्रकार परिषदेतून गावकऱ्यांनी निषेध करून यासाठी न्यायालयीन लढण्याची तयारी दर्शविली.
खरूस येथील नारायणराव पाटील वानखेडे १९६२ साली सरपंच होते. त्यांनी गावालगतची एक एकर जमीन व त्याच गावातील माधवराव वानखेडे यांनी ५७ गुंठे अशी एक एकर ५७ गुंठे जमीन शाळेच्या व गाव विकासासाठी दिली होती. नारायणराव पाटील सरपंच असताना या जमिनीसंदर्भात ग्रामपंचायतीने ठरावही घेतला होता. १९६७ पासून या जागेवर विकास कामे करण्यात आली. तेथे जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी निवासस्थाने, अंगणवाडी, गोदाम व ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. २०१० पर्यंत सगळे व्यवस्थित होते. परंतु अचानक २०१०-१५ या काळात याला ग्रहण लागले. नारायणराव पाटील यांचा मुलगा तालुका भाजपाध्यक्ष सतीश वानखेडे यांनी दान दिलेल्या जागेवर आपला हक्क सांगणे सुरू केले. एक एकर जमीन माझी आहे, या सबबीखाली ग्रामपंचायत विरोधात २०१३ मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर प्रकरण दाखल केले. त्यावेळी तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला. प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनी दानपत्राचे सबळ पुरावे नाहीत, या सबबीखाली सतीश वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर त्यांची भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड झाली. आपल्या राजकीय पदाचा फायदा घेत त्यांनी एक एकर जागेवर तार कुंपण करून कब्जा केला. जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सतीश वानखेडे यांना ताबापत्र दिले. वडिलांचे वचन मोडल्यामुळे सतीश वानखेडे यांच्याविरोधात गावात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती पत्रपरिषदेत माजी सरपंच श्यामराव वानखेडे, बालाजी वानखेडे, लक्ष्मण कांबळे, उपसरपंच गोविंद वानखेडे, माजी उपसरपंच विजय कांबळे, सोसायटीचे अध्यक्ष पंजाबराव वानखेडे यांनी केला आहे.
यासंदर्भात भाजपा उमरखेड तालुकाध्यक्ष सतीश वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमचे वडील नारायणराव पाटील यांनी त्यावेळी स्वखर्चातून निवासस्थाने आणि इतर बांधकामे केली. गावकऱ्यांच्या सुविधेसाठी ही उभारणी करण्यात आली. शासनाचा कोणताही निधी घेतला नाही. ही जमीन आमचीच असून आता तिचा कायदेशीर ताबा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात आदेश दिले आहे. गावकऱ्यांचा हा प्रकार म्हणजे मला बदनाम करण्याचे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)