शिक्षण प्रशिक्षण केंद्रावर पंचायत समितीचा ताबा
By admin | Published: July 22, 2016 02:13 AM2016-07-22T02:13:09+5:302016-07-22T02:13:09+5:30
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली.
अडचणीत वाढ : केंद्रीय विद्यालयाने मागितला आणखी एक कक्ष
यवतमाळ : सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली. हे केंद्र पूर्णत्वास येताच पंचायत विभागाने त्यावर ताबा मिळविला तर, दुसरीकडे केंद्रीय विद्यालयाने सर्वशिक्षा अभियानाच्या खोल्या रिकाम्या करून मागितल्या. यामुळे सर्वशिक्षा अभियानाचे साहित्य आणि कर्मचारी उघड्यावर आले आहे. कपाट वऱ्हांड्यात आहेत. कर्मचारी अधांतरी फिरत आहेत.
यवतमाळच्या गोधनी मार्गावर सर्वशिक्षा अभियानाचे कार्यालय आहे. याच ठिकाणी केंद्रीय विद्यालयही उघडण्यात आले आहे. पूर्वी या विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आता पटसंख्या वाढली आहे. यामुळे केंद्रीय विद्यालयाने काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाला सर्वशिक्षा अभियानाच्या तीन खोल्या रिकाम्या करून मागितल्या होत्या. यानुसार शिक्षण विभागाने या खोल्या रिकाम्या करून दिल्या.
मात्र सर्व शिक्षा अभियानाचे हे साहित्य ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच परिसरात शिक्षण विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रामध्ये पंचायत विभागाने कृषी साहित्य भरले आहे. यामुळे शिक्षण विभागाने पंचायत विभागाला प्रशिक्षण केंद्र रिकामे करून मागितले. यानंतरही प्रशिक्षण केंद्र रिकामे झाले नाही. यामुळे पंचायत विभागाच्या गटविकास अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाने रितसर पत्र दिले. मात्र आजही या कक्षावर पंचायत विभागाचाच ताबा आहे.
या सर्व प्रकरणात सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी मात्र उघड्यावर आले आहे. अपंग समावेशित शिक्षण विभागाचे कपाट व्हरांड्यात ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कामे करण्यासाठी इतर विभागाच्या कक्षाचा आश्रय घ्यावा लागत आहे. याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मानकर यांच्याशी संपर्क साधला असता, येत्या आठ ते दहा दिवसात पंचायत विभाग शिक्षण विभागाचा कक्ष खाली करून देणार आहे. या ठिकाणी कृषी साहित्य ठेवण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात हा कक्ष रिकामा पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. (शहर वार्ताहर)