तंटामुक्त समित्यांचे गावांवरील नियंत्रण सुटले
By admin | Published: October 15, 2015 03:01 AM2015-10-15T03:01:25+5:302015-10-15T03:01:25+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे.
पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून पुरस्कारप्राप्त गावांचेच आता सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे.
गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे मोठ्या भांडणात रूपांतर होवू नये, गावातील वाद गावातच सोडविला जावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा व शांतता टिकावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तंटामुक्त गाव समिती आणि पोलिसांच्या सहकार्यातून अनेक गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन झाले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदू लागली. परंतु आता या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषावर पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार राशी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होताच तंटामुक्त समिती व नियंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडला. त्यांना विश्वासात न घेता सरपंच, सचिवांनी निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावावरील पकड सैल झाली. गावात पुन्हा अवैध धंदे फोफावू लागले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय केला जात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच मटका, जुगार, दारू आदींच्या मागे लागले आहे. यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावात भानगडीही निर्माण होत आहे.
पुरस्कारप्राप्त गावांचीच ही अवस्था असेल तर इतर गावांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता पुरस्कारप्राप्त गावांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून गाव समित्यांना पुन्हा ऊर्जा मिळेल आणि नव्या दमाने काम करण्याची संधी निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)