वणीत अतिक्रमणावरून वादंग
By admin | Published: January 22, 2017 12:16 AM2017-01-22T00:16:41+5:302017-01-22T00:16:41+5:30
एक आठवड्याचा ब्रेक घेत शनिवारी वणी शहरातील गांधी चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.
गांधी चौकात राबविली मोहिम : व्यापाऱ्यांना सूट देत असल्याचा आरोप
वणी : एक आठवड्याचा ब्रेक घेत शनिवारी वणी शहरातील गांधी चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. मात्र या अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना व्यापाऱ्यांना सूट देत असल्याचा आरोप झाल्याने चांगलाच वादंग झाला. त्यामुळे काही वेळ ही मोहिम थांबविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पुन्हा ही मोहिम सुरू करण्यात आली.
यापूर्वी १४ जानेवारीला येथील न्यायाधिशांच्या निवासस्थानापासून ते देशमुखवाडी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आली. यात गरीबांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्याने अनेक संसार उघड्यावर आलेत. या दरम्यान, काहींनी श्रीमंत, राजकारणी आणि व्यापाऱ्यांना सुट दिली जाते. गरीबांच्याच घरावर बुलडोझर चालतो, अशी व्यथा मांडली. मात्र यावेळी मोहिम राबविणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत या मोहिमेतून कोणताही अतिक्रमणधारक सुटणार नाही. कायद्यानुसार सर्व अतिक्रमणधारकांच्या बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर एक आठवडा मोहिमेला ब्रेक देण्यात आला. शनिवारी सकाळी १०.३० वाजतापासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले मात्र उपस्थित नव्हते. अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असताना काही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. आमच्याकडे लीज आहे. त्यामुळे लिजच्या जागेवरील अतिक्रमण हटवू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या दरम्यान, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे तेथे पोहचले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना लिजवर असलेली पाच फुटाची जागा द्यावी, अशी सूचना अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकाऱ्यांना केली. मात्र हा प्रकार नियमाला धरून नाही. न्यायालयाच्या प्रक्रीयेत कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका माजी नगरसेवक अखिल सातोकर व सिद्धीक रंगरेज यांनी घेतली. या मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गरीबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनाने श्रीमंतांना सूट देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ( प्रतिनिधी)
रविवारची मोहिम केली स्थगित
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस वणी शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार होती. मात्र शहरातील गांधी चौैकात आज वादंग झाल्याने तसेच रविवारी आठवडी बाजार असल्याने ही मोहिम स्थगित करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेचे बांधकाम अभियंता गिरीश डुब्बेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या नंतर राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहिम मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्या उपस्थितीत केली जाईल, असे ते म्हणाले.