यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

By सुरेंद्र राऊत | Published: September 21, 2022 02:57 PM2022-09-21T14:57:35+5:302022-09-21T15:02:12+5:30

डोल्हारकर यांनी एकतर्फी घेतला पदभार

Controversy over the post of Chief Executive in Yavatmal Municipal Council | यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

Next

यवतमाळ : शहरात मागील आठ दिवसांपासून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदलीवरून आंदोलन पेटले आहे. मडावी यांना समर्थन देणाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या विरोधात सफाई कामगारांनी आंदोलन केले होते. मंगळवारी मडावी यांची बदली झाल्याचा आदेश धडकला. त्यांच्या जागेवर कारंजा येथील  दादाराव डोल्हारकर यांना नियुक्ती मिळाली. बुधवारी सकाळी डोल्हारकर पदभार घेण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले. तेथे वाद झाल्याचा आरोप माधुरी मडावी यांनी केला. तशी तक्रारच शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

माधुरी मडावी यांची सहायक आयुक्त अमरावती येथे बदली झाली. बदली आदेशातच कार्यमुक्त करीत असल्याचे नमूद होते. बदली आदेश मिळताच बुधवारी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रमाणे दादाराव डोल्हारकर सकाळी मुख्याधिकारी यांच्या कक्षात पदभार घेण्यासाठी पोहोचले.
तेथे माधुरी मडावी या सीओंच्या खुर्चीत बसून होत्या.

डोल्हारकर यांनी त्यांच्याकडे पदभाराची मागणी केली. मात्र दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे स्वत:च्या घरुन खुर्ची बोलाविली व ती बाजूला ठेवून एकतर्फी पदभार घेतला, असे डोल्हारकर यांनी सांगितले. धक्काबुक्की करणे किंवा अपमानित करणे असा कुठलाही प्रकार घडला नाही. यावेळी कक्षात पोलीस व महिला कर्मचारीसुद्धा उपस्थित होत्या. पदभार घेताना कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र देणे अपेक्षित असते. मात्र ही प्रक्रिया झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

माधुरी मडावी यांनी दादाराव डोल्हारकर यांच्यासह २५ जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. प्रभाग सोपविण्याची प्रक्रिया करीत असताना डोल्हारकर कुठलीही परवानगी न घेता मोठी खुर्ची घेवून कक्षात बळजबरीने आले. त्यांनी ती खुर्ची माझ्या बाजूला ठेवली व तेथेच बसले. त्यांच्या वागण्याने अतिशय लज्जास्पद व अपमानकारक वाटले. या कृतीने माझ्या कामात खोळंबा निर्माण झाला. प्रभार सोपविण्याची प्रक्रिया करू दिली नाही, असा आरोप माधुरी मडावी यांनी त्यांच्या तक्रारीवरून केला आहे. दरम्यान, बदली रद्द व्हावी यासाठी मडावी यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतल्याची माहिती आहे. मात्र तेथे त्यांची याचिका सुनावणीतच निकाली काढल्याचे सांगितले जात आहे. पदभारावरून झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. 

अन्‌ मडावींचे फलक हटले

मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगरपरिषद कार्यालयात व इमारतीत दर्शनी भागात स्वत:चे फलक लावले होते. बऱ्याच दिवसानंतर हे फलक बुधवारी सकाळी काढण्यात आले. नवीन मुख्याधिकाऱ्यांनी पदभार घेताच तातडीने हे फलक काढण्याचे आदेश दिले. त्यावरून ही कार्यवाही झाली.

राेड शो नाही कामाला प्राधान्य - डोल्हारकर

रोड शो न करता कामाला प्राधान्य दिले जाईल, सध्या सुरू असलेली सर्व कामे पूर्ण केली जाईल. नाट्यगृहाचे काम, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सौंदर्यीकरण याशिवाय इतर महत्वपूर्ण कामे मार्गी लावले जातील. लवकरच माझ्या कार्याची छबी यवतमाळकरांना दिसेल. जनसामान्यांची कामे प्राधान्याने करण्यात येईल. यवतमाळ ही माझी शैक्षणिक व कर्मभूमी आहे. जिल्ह्यातील नगर प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे येथील समस्यांची जाणीव आहे, असे दादाराव डोल्हारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Controversy over the post of Chief Executive in Yavatmal Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.