सहकारी जिनिंगच्या जागेची ‘सरकारी’ किंमत १३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:09 PM2017-11-07T22:09:06+5:302017-11-07T22:09:16+5:30
धामणगाव रोडवरील यवतमाळ सहकारी जिनिंगच्या आठ एकर जागेची नेमकी किंमत किती याबाबत प्रचंड गोंधळाची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धामणगाव रोडवरील यवतमाळ सहकारी जिनिंगच्या आठ एकर जागेची नेमकी किंमत किती याबाबत प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. दुय्यम निबंधकांनी रेडीरेकनरनुसार या जागेची किंमत साडेआठ कोटी तर जिल्हा बँकेच्या व्हॅल्यूअरने दहा कोटी निश्चित केली आहे. सरकारी व्हॅल्यूअरने या जागेची किंमत १३ कोटी रुपये सांगितली आहे. प्रत्यक्षात बाजारभावानुसार ही किंमत २४ कोटींच्या घरात आहे. असे असताना जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्यावरील फौजदारीचे संकट टाळण्यासाठी या जागेचा अवघ्या सात कोटीत बेभाव पद्धतीने लिलावाच्या तयारीत आहे.
जिल्हा बँकेने सदर जिनिंगला साडेतीन कोटींचे कर्ज दिले. व्याजासह ते आता सहा कोटी ८४ लाख झाले आहे. मुळात बँकेने हे कर्जच नियमबाह्यरीत्या मंजूर केले. जिल्हा बँकेचे जे संचालक आहेत तेच जिनिंगवर संचालक आहेत. असे असताना हे कर्ज मंजूर झाले कसे हा मुद्दा नाबार्डने उपस्थित केला आहे. याच मुद्यावरून नाबार्डने जिल्हा बँक व जिनिंगच्या संचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. कारण या जिनिंगचे कर्ज एनपीए अर्थात बुडीत झाले आहे. फौजदारीतून वाचण्यासाठी जिल्हा बँकेने सहा कोटी ८४ लाखांच्या कर्ज वसुलीचा ध्यास घेतला. त्यासाठी बँक आता चक्क जिनिंगची २४ कोटी रुपये किंमत असलेली आठ एकर जागा अवघ्या सात कोटीत विकण्याच्या तयारीत आहे. जिल्हा बँक आपल्या बचावासाठी सहकारी जिनिंगच्या जागेचा नाममात्र किंमतीत बळी देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जाची वसुली करून नाबार्डच्या आदेशाची परिपूर्तता करणे एवढेच जिल्हा बँकेचे सध्याचे टार्गेट असल्याचे दिसते. त्यासाठीच जिनिंगच्या जागेचा बेभाव लिलाव केला जात आहे. मात्र सहकारी तत्वावरील जिनिंग असूनही त्याचे संचालक किंवा शेतकरी एक शब्दही बोलण्यास तयार नाही. जिनिंगचा सर्वेसर्वा असलेल्या सहकारातील एका नेत्याने जिनिंगच्या पदाधिकारी व संचालकांचे अतिशय थंड डोक्याने व दूरदृष्टीने टप्प्याटप्प्याने राजीनामे घेतले. त्यामुळे जिनिंगच्या या व्यवहारातील संपूर्ण लाभ त्या नेत्याला मिळतो आहे. जिनिंगचा एक प्रमुख पदाधिकारी चक्क एका मॉलमध्ये काम करतो आहे. यावरून हे संचालक जिनिंगच्या प्रत्यक्ष लाभापासून कोसोदूर आहेत.
जागेच्या किंमतीचा गोंधळात गोंधळ
बाजार भावानुसार २४ कोटींची जागा सात कोटीत बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव मांडलेल्या जिल्हा सहकारी बँकेला मुळात सरकारी व्हॅल्यूअरनेच चपराक दिली आहे. या व्हॅल्यूअरने सदर जागेची किंमत सुमारे १३ कोटी रुपये निश्चित केली. रेडीरेकनरनुसार दुय्यम निबंधकांनी ही किंमत साडेआठ कोटी सांगितली आहे. बँकेच्या व्हॅल्यूअरने ही किंमत दहा कोटी निश्चित केली. यावरुन जागेच्या किंमतीबाबत व्हॅल्यूअरमध्येच एकमत नसल्याचे स्पष्ट होते.
जिल्हा बँक संचालकांची शुक्रवारी बैठक
जिल्हा बँकेच्या संचालकांची १० नोव्हेंबरला बैठक आहे. त्यात जिनिंगच्या आठ एकर जागेसाठी आलेले सात कोटींचे टेंडर मंजूरीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र प्रकरण मुंबई-पुण्यात पोहोचल्याने व कोणत्याही क्षणी प्रशासक, चौकशी, फेरनिविदा, हिवाळी अधिवेशनासाठी एलएक्यु यासंबंधीचे आदेश धडकण्याची शक्यता असल्याने संभाव्य निर्णय भविष्यात बँक संचालकांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.