कोरोना ईज बॅक ; जिल्ह्यात 40 तासांची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:00 AM2021-02-27T05:00:00+5:302021-02-27T05:00:03+5:30
शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा रोग जेवढा खतरनाक तेवढाच लाॅकडाऊनचा इलाजही त्रासदायक अशी नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रशासनाची अवस्थाही दोलायमान झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला रोखायचे या निर्धाराने जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ९ वाजतापर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसारच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवार १ मार्चच्या सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या ४० तासात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना आणि दळणवळण बंद राहणार आहे.
शनिवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू होणार असल्याने शनिवारी दिवसभर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजन केले आहे. संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२४१ जणांना लागण, तिघांचा घेतला बळी
डिसेंबरमध्ये किंचित ढिला पडलेला कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा घट्ट होत चालला आहे. फेब्रुवारीत तर या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल २४१ जणांना कोरोनाची लागण झाली; तर एकाच दिवसात तीनजणांचे बळी गेले. शुक्रवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ येथील ६० वर्षीय व ८२ वर्षीय पुरुष, तर मानोरा (जि. वाशिम) येथील ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या २४१ जणांमध्ये १४१ पुरुष आणि १०० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील ११३ रुग्ण, दिग्रस येथील ४४, पुसद येथील ३६, घाटंजी येथील ९, नेर येथील ७, पांढरकवडा येथील ६, दारव्हा येथील ६, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी ५, आर्णी, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
शुक्रवारी प्रशासनाला एकूण १३७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २४१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले; तर ११३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ९७ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५४ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार २१३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४५७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ६० हजार ४१ नमुने पाठविले असून यांपैकी एक लाख ५९ हजार ३२४ अहवाल प्राप्त झाले; तर १७१७ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४१ हजार २२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
१५४ जण कोरोनामुक्त
कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोरोनाविरुद्धच्या युद्धालाही गती आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. शुक्रवारी सुमारे २५० नवे रुग्ण आढळले असले तरी तब्बल १५४ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. या १५० रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.