ढाणकी येथे कोरोनाचा ब्लास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:40 AM2021-04-13T04:40:09+5:302021-04-13T04:40:09+5:30
शहरातील खासगी दवाखाने रुग्णांनी खाचाखच भरले आहे. कोणता रुग्ण साधा आणि कोणता कोरोनाचा, हे ओळखणे कठीण झाल्याने सर्व रुग्णांकडे ...
शहरातील खासगी दवाखाने रुग्णांनी खाचाखच भरले आहे. कोणता रुग्ण साधा आणि कोणता कोरोनाचा, हे ओळखणे कठीण झाल्याने सर्व रुग्णांकडे संशयाने पहिले जात आहे. शहरात सध्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गळा खवखवणे, अंग दुखणे, सर्दी, ताप अशा दुखण्याने अनेक जण ग्रस्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कोरोना झाला की काय, अशी भीती वाटत आहे. येथील नगरपंचायत नव्यानेच स्थापन झाल्याने नवीन नगरसेवकांनासुद्धा काय करावे आणि आपली जबाबदारी काय, हे कळेनासे झाले आहे.
काही नगरसेवक सोडले, तर उर्वरितांनी आपल्या प्रभागात जनजागृतीही केली नाही. केवळ सोशल मीडियावर चर्चा करण्यातच ते धन्यता मानत आहे. त्यामुळे जनतेत रोष व्यक्त होत आहे. मुख्याधिकारीसुद्धा मुख्यालयी न राहता अपडाऊन करण्यात. त्यामुळे त्यांचेही सपशेल दुर्लक्ष होत आहे. सध्या शहरात जनजागृती करणे गरजेचे आहे. बाजारपेठ बंद असून नागरिक आपापल्या घरी बसून आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकाला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे. गेल्या चार दिवसांपासून कोणी ना कोणी मृत्यूच्या जबड्यात सापडत आहे. काही नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुढे येत नसल्याने पॉझिटिव्ह असणारेसुद्धा घरामध्ये दडून बसले आहे. या सर्व गंभीर बाबींवर नगरपंचायतीकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे.
उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी ढाणकीतील वाढती रुग्णसंख्या पाहता लक्ष ठेवून आहे. आरोग्य विभागानेही लक्ष देऊन शहरातील प्रत्येक नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे. अन्यथा शहरांमध्ये कोरोनाचे तांडव होऊन मृतांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. नगरपंचायतीने आपली जबाबदारी ओळखून आणि आपसी मतभेद दूर करून गावाच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.