कोरोनाच्या धास्तीने शाळांना सुट्या जाहीर कराना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:06+5:30
यवतमाळातील १० जणांचा गट दुबई टूरवर जाऊन आल्यानंतर त्यातील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ९ जणांना विषाणूची बाधा झालेली नसली तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकाराने यवतमाळ शहरवासीयांमध्ये संसर्गाबाबत धास्ती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळण्याच्या सूचना राज्यशासनाने केल्या आहेत. मात्र शेकडो चिमुकले विद्यार्थी दररोज शाळेत एकत्र येत आहेत, एकत्र खेळत आहेत. या परिस्थितीने पालकांच्या मनात धडकी भरली असून खुद्द शिक्षक वर्गही शाळेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी करीत आहेत.
यवतमाळातील १० जणांचा गट दुबई टूरवर जाऊन आल्यानंतर त्यातील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ९ जणांना विषाणूची बाधा झालेली नसली तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकाराने यवतमाळ शहरवासीयांमध्ये संसर्गाबाबत धास्ती निर्माण झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी विषाणूच्या संसर्गाची शक्यता अधिक असल्याचे गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विविध कार्यक्रम याच कारणाने रद्द करण्यात आले. खुद्द तालुकास्तरावर होणारा शिक्षणोत्सवसुद्धा स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत मात्र एकत्र येत आहेत. प्रौढ व्यक्ती किमान संसर्ग टाळण्यासंदर्भात जागरूकतेने वागू शकतात, मात्र चिमुकल्या विद्यार्थ्यांना याचे कितपत भान असेल, याबाबत पालकांना साशंकता आहे. त्यामुळे शाळांना सुट्या जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र या विषयावर पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने हा विषय तूर्त अधांतरी आहे.
स्थलांतरित मजूर पालकांचा प्रश्न
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांचे पालक दिवाळीत उसतोडणीसाठी व इतर रोजगारासाठी इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाले होते. यातील अनेक पालक हे पुण्या-मुंबईत गेले होते. ते आता गावात परतत आहेत. त्यामुळे संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. ही स्थिती बघता शाळांना लवकर सुट्या जाहीर करण्याची मागणी खुद्द जिल्हा परिषद वर्तृळातून होत आहे. शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे मागणी नोंदविली आहे.
२० मार्चपर्यंत परीक्षा घ्या
जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना साधारण एप्रिल महिन्यापर्यंत शाळेत जावे लागणार आहे. लोहारा येथील एका जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण घेतले, तरी तेथे ६०० विद्यार्थी दररोज शाळेत येतात, त्याअनुषंगाने रोज २०० पालकांची ये-जा होते. या गर्दीत चिमुकल्यांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवायचे असेल, तर त्यांच्या परीक्षा (मूल्यमापन) २० मार्चपर्यंतच आटोपून सुट्या द्याव्या, हवे तर शिक्षकांना पूर्ण सत्र संपेपर्यंत शाळेत बोलवावे, अशी मागणी शिक्षण समिती सदस्य मधुकर काठोळे यांनी सीईओंकडे केली आहे. समितीचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सतपाल सोवळे यांनीही हीच मागणी नोंदविली आहे.
नगरपालिकेच्या शाळा दरवर्षीच २० मार्चपासून सकाळ सत्रात भरविल्या जातात. यंदा त्याबाबत निर्णय व्हायचा आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शाळांना सुट्या द्यायच्या का, याबाबत अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही निर्देश नाहीत. मात्र लवकर सुट्या दिल्यास अभ्यासक्रम अपूर्ण राहून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि विषाणूची बाधाही टाळता यावी, असा मध्यम तोडगा काढला पाहिजे.
- योगेश डाफ, प्रशासन अधिकारी, नगरपालिका, यवतमाळ
बालकांना कोरोनाचा फारसा धोका नाही
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी गुरूवारच्या पत्रकार परिषदेत शाळांसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ९ वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अद्याप एकही उदाहरण आढळले नाही. या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने वयोवृद्धांना होताना आढळत आहे. शिवाय, आपल्या जिल्ह्यात अद्याप या संसर्गाची तेवढीशी तीव्रता नाही.
कोरोनामुळे वातावरण गंभीर असले तरी सध्याच शाळांना सुट्या दिल्या जाणार नाही. मात्र शाळांनी काय खबरदारी घ्यायची आहे, या संदर्भातील सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी त्यांचे कामकाज करावे.
- एम.डी. सिंह
जिल्हाधिकारी, यवतमाळ
गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका असतो, हे जरी खरे असले, तरी अद्याप शाळांना सुट्या जाहीर करण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत. निर्देश आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- दीपक चवणे, शिक्षणाधिकारी