कोरोना कोपला, पुन्हा 34 जणांना झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:31+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ८८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील दहा जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. आतापर्यंत एकंदर ७३ हजार ५७ नागरिकांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली.

Corona Kopla, again infected 34 people | कोरोना कोपला, पुन्हा 34 जणांना झाली लागण

कोरोना कोपला, पुन्हा 34 जणांना झाली लागण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मध्यंतरी ओसरलेला कोरोना पुन्हा कोपला आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ३४ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे. त्यामुळे निर्बंध वाढविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ८८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील दहा जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. आतापर्यंत एकंदर ७३ हजार ५७ नागरिकांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली. त्यातील ७१ हजार १९२ नागरिक कोरोनामुक्त झाले. तर १७८८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. गेल्या दीड वर्षात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढविला. आतापर्यंत एकंदर सात लाख ८९ हजार ८४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सात लाख १६ हजार ७२४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.२५ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गुरुवारी ३.८५ होता. तर जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर २.४५ इतका आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घेण्याची गरज आहे. 

कुठे किती रुग्ण आढळले 
- गुरुवारी आढळलेल्या ३४ कोरोना रुग्णांपैकी १६ महिला तर १८ पुरुष आहेत. आर्णी, बाभूळगाव, उमरखेड, नेर, झरीजामणी या पाच ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. पांढरकवडा येथे तीन, राळेगाव येथे दोन तर वणी येथे तीन रुग्ण आढळून आले. यवतमाळ येेथे मात्र एकाच दिवसात तब्बल १६ रुग्णांची नोंद झाली. तर गुरुवारी आढळलेल्या ३४ रुग्णांपैकी पाच रुग्ण अन्य जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

दर दिवसाला चार हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासकीय यंत्रणाही ॲक्शन मोडवर आली आहे. सर्वत्र  खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दर दिवसाला चार हजार नागरिकांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे उद्दिष्ट यंत्रणेने डोळ्यांपुढे ठेवलेे आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ४० नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणार आहे.

समारंभांमध्ये परजिल्ह्यातील लोकांची हजेरी घातक 
- निर्बंध असले तरी जिल्ह्यात अजूनही लग्नसमारंभ धडाक्यात पार पडत आहे. या समारंभाच्या निमित्ताने परजिल्ह्यातील पाहुणे मंडळीही हजेरी लावत आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५ जण अन्य जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. ही मंडळी समारंभाच्या निमित्ताने जिल्ह्यात येवून बाधित झाली की त्यांना आधीच संसर्ग झाला व यवतमाळात तपासणी झाली याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

शाळेवर विशेष लक्ष केंद्रीत करा
- रूग्णसंख्या वाढत असल्याने शाळेत कोरोना नियमाचे पालन करण्याच्या सूचना आहेत. या नियमाचे पालन होत नसेल तर थेट शाळांवर कारवाई होणार आहे. त्या दृष्टीने कामकाज करण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नियमांचे पालन होत नसल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमोल येडगे, 
जिल्हाधिकारी, यवतमाळ

शाळांसाठी बंदी नाही, पण निर्बंध कठोर 
- अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे शाळा पुन्हा बंद झालेल्या असल्यातरी यवतमाळ जिल्ह्यातील शाळा बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा अद्याप कुठलाही आदेश नाही. मात्र गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी कठोर नियमावली जाहीर केली. 
- त्यानुसार शाळेमध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यावर सध्या बंदी आली आहे. शाळा दोन सत्रात भरवावी लागणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सुरक्षित अंतर, शाळा व परिसर सॅनिटाईज करणे, वर्गखोल्यांची दारे, खिडक्या सतत उघड्या ठेवणे, स्वच्छतागृहात एकाच वेळी गर्दी न करणे, विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मास्कची अदलाबदली न करणे, त्यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे, शाळेत मुबलक पाणी, साबण उपलब्ध ठेवणे आदी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केल्या आहेत. 

 

Web Title: Corona Kopla, again infected 34 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.