कोरोनाचे रुग्ण घटले; शेकडो बेड रिकामे पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 05:00 AM2021-05-31T05:00:00+5:302021-05-31T05:00:05+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २२७८ बेड विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल १८७८ बेड सध्या रिकामे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटणे हे चांगले संकेत मानले जात आहे. दरम्यान, रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर वावरताना नागरिकांनी अजूनही कोरोनाची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णाला बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र सध्या जिल्ह्यातील उपलब्ध बेडपेक्षाही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दवाखान्यांतील रिकाम्या बेडचे प्रमाण वाढले आहे. रविवारी जिल्ह्यात केवळ १२३ नव्या पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर तब्बल ३०० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६४९ एवढी घसरली आहे. मात्र दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने काळजी पूर्णत: मिटल्याची चिन्हे नाहीत.
रविवारी झालेले तिन्ही मृत्यू खासगी दवाखान्यात नोंदविण्यात आले. त्यात पांढरकवडा तालुक्यातील ५३ वर्षीय पुरूष, वणी तालुक्यातील ६५ व ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या १२३ जणांमध्ये ९० पुरुष आणि ३३ महिला आहेत. यात आर्णी येथील ३, बाभूळगाव येथील २८, दारव्हा येथील १८, दिग्रस येथील २०, घाटंजी २, कळंब २, महागाव येथील १, मारेगाव येथील १, नेर येथील २, पांढरकवडा २, पुसद येथील १६, राळेगाव ४, उमरखेड १, वणी येथील ४, यवतमाळ १७ तर झरीजामणी येथील २ रुग्ण आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २२७८ बेड विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल १८७८ बेड सध्या रिकामे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटणे हे चांगले संकेत मानले जात आहे. दरम्यान, रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर वावरताना नागरिकांनी अजूनही कोरोनाची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. लसीकरणाला प्रतिसाद देऊनच कोरोना प्रतिबंध शक्य असल्याचे सांगण्यात आले.
मृत्यूदर अडीच टक्केच
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्हयात आतापर्यंत सहा लाख १९ हजार २५३ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ४४ हजार २९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.६० असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.८२ टक्के आहे तर मृत्युदर २.४५ टक्के आहे.
दिवसभरात चार हजार अहवाल निगेटिव्ह
रविवारी एकूण ४३५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४२३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६४९ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ६९४ रुग्णालयात भरती आहेत.तर ९५५ जण गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ८१३ झाली आहे. रविवारी ३०० जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६८ हजार ४०४ आहे. तर एकूण १७६० मृत्यूची नोंद आहे. दरदिवशी रुग्णांचा आकडा घटत असला तरी मृत्युसंख्या अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. रविवारीही तीन बळी गेले.