कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:00 AM2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:49+5:30
यवतमाळ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास साडेनऊ लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अजूनही २० लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तींनी लसीकरण केले नाही, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करीत असतानाच बुधवारी हा प्रकार घडल्याने अनेकांना या केंद्रांवरून रिकाम्या हाताने परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरून उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असतानाच लसीकरणासाठीची नोंदणी करणाऱ्या तब्बल १७५ ऑपरेटरला अचानक कामावरून कमी केल्याने बुधवारी यवतमाळ शहरासह विविध ठिकाणची लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठीचा निधी कमी केल्याने लसीकरण मोहिमेवरील रोजंदारीवरील १७५ कर्मचाऱ्यांचे २४ ऑगस्टपासून काम थांबविण्यात आले आले. यामध्ये ऑपरेटरचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑपरेटरच्या नोंदणीशिवाय लसीकरण होत नाही. याची माहिती असतानाही याबाबतची कार्यवाही झाल्याने बुधवारी शहरात गोंधळ उडाला.
यवतमाळ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास साडेनऊ लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अजूनही २० लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तींनी लसीकरण केले नाही, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करीत असतानाच बुधवारी हा प्रकार घडल्याने अनेकांना या केंद्रांवरून रिकाम्या हाताने परतावे लागले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्याचे कारण पुढे करीत लसीकरण केंद्रातील ऑपरेटरची नियुक्ती थांबविण्यात आल्याचे समजते. हे सर्व ऑपरेटर लसीकरण केंद्रावर येणाऱ्या व्यक्तींची ऑनलाइन नोंद करीत होते. यानंतर प्रत्यक्ष लसीकरणासाठी त्यांची नोंद होत होती. बुधवारपर्यंत काम करण्याचे आदेश या ऑपरेटर मंडळींना होते. रोजंदारीने असलेले हे कर्मचारी नियुक्ती आदेश नसल्याने गुरुवारी केंद्रावर आले नाहीत. यामुळे या केंद्रांवर लस पोहोचल्यानंतर ऑनलाइन नोंद करण्यासाठी कुणीच कर्मचारी नसल्याने केवळ ६५ केंद्रांवर एमपीडब्ल्यू आणि गटप्रवर्तकाने लसीकरण केले. सरासरी दोन हजार ते ५० हजारापर्यंत एका दिवशी लसीकरण झाल्याची नोंद लसीकरण विभागात झाली आहे. गुरुवारी मात्र ही लस उपलब्ध असतानाही ऑपरेटरअभावी लसीकरण मोहीम थांबल्याचे चित्र होते. या लाभार्थींना दुसऱ्या दिवशी येण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या.
केंद्र शासन आणि राज्य शासनाने फंडींग बंद केले आहे. राज्य शासनाच्यावतीने लवकरच डाटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्याला १०४ नवीन डाटा एन्ट्री ऑपरेटर मिळणार आहे. तोपर्यंत गटप्रवर्तक आणि एमपीडब्लू कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
- श्रीकृष्णनाथ पांचाळ
मुख्य कार्यकारी अधिकारी,
यवतमाळ