कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:47+5:302021-04-07T04:41:47+5:30
जिल्हाधिकारी येडगे : दिग्रस येथे लसीकरणाची पाहणी, प्रतिबंधित क्षेत्राला भेट (फोटो) दिग्रस : कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असून ती ...
जिल्हाधिकारी येडगे : दिग्रस येथे लसीकरणाची पाहणी, प्रतिबंधित क्षेत्राला भेट
(फोटो)
दिग्रस : कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असून ती टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. दिग्रस येथे कोविड परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी हे आवाहन केले.
तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिग्रस येथे आढावा घेतला. शहरातील काही कंटेन्मेंट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या काही वृद्धांशी त्यांनी संवाद साधला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम सांगितला. यामध्ये मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, स्वच्छता राखणे आदींबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्याचप्रमाणे लसीकरण संदर्भाची माहिती देताना म्हणाले की, प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असून प्रत्येकाने शक्य होईल तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे, असे येडगे म्हणाले.
या भेटी प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकटेश राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार राजेश वझीरे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, तालुका आरोग्य ङाॅ. कृष्णादास बाणोत तसेच प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.