कोरोनाची धास्ती नको, पण धोका टळलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:30+5:30

जिल्ह्यातील २७ लाख ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेत साथरोग नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. रविवारच्या जनता कर्फ्यू दरम्यान विषारी वायू सोडणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहे. मात्र ही अफवाच असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.

Corona should not be intimidated, but the danger is not avoided | कोरोनाची धास्ती नको, पण धोका टळलेला नाही

कोरोनाची धास्ती नको, पण धोका टळलेला नाही

Next
ठळक मुद्देमास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा वाढविण्याचे निर्देश दिले, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ५० पेक्षा जास्त आदेश काढले गेले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याशी साधलेला संवाद...
‘साथरोग अधिनियम १८९७’मध्ये कोणत्या तरतुदी आहे?
साथरोगाला प्रतिबंध घालण्यासाठी हा अधिनियम आहे. केंद्र शासनाला खात्री झाल्यानंतरच कुठल्याही राज्याला हा आदेश काढता येतो. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. यातूनच सध्या विविध उपाय योजनांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. सोमवारपासून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उल्लंघन करणारा व्यक्ती दंड संहिता कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र होतो. त्याविरोधात कुठलाही दावा करता येत नाही. अशा व्यक्तीला एक ते सहा महिने कारावास आणि दंडाची तरतूदही या अधिनियमनात आहे. साथरोग झाल्याचा संशय असल्यास व्यक्तीची तपासणी करणे, रूग्णालय अथवा इतर ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून साथरोगाच्या प्रसाराला प्रतिबंध घालता येतो.
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले काय?
नागपूर, मुंबई, पुण्यात ज्या स्वरूपाचे लॉकडाऊन आहे, तसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात नाही. इथे मोठे उद्योग आणि हब सेंटर नाही. मात्र उपलब्ध आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी काम करतील आणि ५० टक्के कर्मचाºयांनी वर्क फ्रॉम होम या स्वरूपात काम करण्याचे आदेश आहेत. मात्र काही उद्योग आदेशाचे पालन करत नाही, अशा तक्रारी आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीस यंत्रणा जाऊन थेट कारवाई करणार आहे. हॉटेल, मॉल, दारू दुकान, पानटपºया, मंगलकार्यालय, केशकर्तनालय, मनोरंजन केंद्र, तरणतलाव पूर्णत: बंद करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास इतरही उपाय योजना होणार आहेत.
या काळात अत्यावश्यक सेवा बंद राहणार काय?
साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दुध, भाजीपाला, किराणा, औषधी दुकान, रूग्णालय, वृत्तपत्रे, पेट्रोलपंप या अत्यावशक सेवा आहेत. त्यावर कुठलेही निर्बंध नाही. अनेक जण कायद्याच्या तरतुदीचा चुकीचा अर्थ काढत आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही. मी स्वत: जोडमोहाला उतरलो. यावेळी व्यावसायिकांना आवाहन केले. हॉटेलमध्ये चार ते पाच व्यक्तीपेक्षा अधिक गर्दी नसावी, दोन टेबलमध्ये दोन फुटाचे अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसे आदेशही इतर ठिकाणांसाठी पाठविले आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना ग्राहक दुकानामध्ये चार ते पाच मिनीट थांबतो. यामुळे साथरोग पसरत नाही.
पुरेसे मास्क, सॅनिटायझर उपलब्ध नाही, काळाबाजार वाढला आहे?
मुळात रूग्ण आणि डॉक्टर, नर्सला मास्क सक्तीचे आहे. कारण ते प्रत्यक्ष रूग्णांच्या संपर्कात असतात. नागरिकांना गर्दीमध्ये मास्क वापरायचे आहे. रूमालही वापरता येतो. तो सर्वाधिक सुरक्षित आहे. मात्र तो दररोज धुतेलला असणे गरजेचे आहे. बाजारात मास्कची टंचाई आहे. त्याची मागणी करण्यात आली आहे. सॅनिटायझर नाही म्हणून घाबरण्याचे कारण नाही. साबणाने स्वच्छ हात धुतले तरी चालेल. वरचे वर हात धुतले पाहिजे. सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाला सॅनिटायझरची मागणी करण्यात आली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहे. अत्यावश्यक साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाला १ कोटी ३० लाख रूपये दिले आहेत. आरोग्य कर्मचाºयांना प्राधान्याने मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्याच्या सूचना आहेत.
होम क्वॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह रूग्णांची प्रकृती कशी आहे?
जिल्ह्यात आतापर्यंत १३७ नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांच्यात कोरोनाचे लक्षण नाही. जे तीन पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, त्यांची प्रकृती चांगली होत आहे. आपल्या जिल्ह्यात तिसºया स्टेजची अवस्था नाही. मात्र बेसावध राहून चालणार नाही. प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे.
होम क्वॉरंटाईन म्हणजे काय?
विदेशातून आलेले लोक आणि पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात येते. त्यांना त्यांच्याच घरी १४ दिवस ठेवले जाते. घराबाहेर न निघण्याची खबरदारी त्यांनी स्वत: घ्यायची असते. घरातील स्वतंत्र खोली त्याला द्यायची आहे. त्यामध्ये त्यांनी एकट्याने १४ दिवस राहायचे आहे. घरातील व्यक्तींनीही त्यांच्याशी संपर्क करायचा नाही. आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडूनही दुरूनच माहिती घेतली जाते. त्यांच्या घरावर पोलीस, आरोग्य विभाग आणि तहसील प्रशासनाला लक्ष ठेवण्याच्या आणि दररोज सायंकाळी संयुक्त अहवाल सादर करण्याच्या सूचना आहे. खोकताना, सर्दी, आजार व इतर लक्षणे आढळली तर लगेच रूग्णालयात आयसोलेशन वॉर्डात हलविले जाते. आपल्याकडे क्वॉरंटाईन केलेल्या १३७ नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाही.

विषारी वायू सोडणार ही केवळ अफवाच, विश्वास ठेवू नका
जिल्ह्यातील २७ लाख ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेत साथरोग नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. रविवारच्या जनता कर्फ्यू दरम्यान विषारी वायू सोडणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहे. मात्र ही अफवाच असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यासोबतच जिल्हा प्रशासनाची संपूर्ण टीम साथरोग रोखण्यासाठी युद्धपातळीवर लढत आहे.

आपला जिल्हा तिसºया स्टेजला नसला तरी आपण काळजी घेतली पाहिजे. केवळ मास्क म्हणजे सुरक्षा नव्हे, हातही स्वच्छ असले पाहिजे. परिसर स्वच्छ असला पाहिजे. विशेष म्हणजे, आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविली पाहिजे. त्याकरिता सकस आहार घेतला पाहिजे. पुढील एक ते दोन महिने संवाद करताना समोरच्या व्यक्तीपासून दोन फूट अंतर राखूनच संवाद केला पाहिजे. भारतीय नमस्काराची पद्धत अवलंबली पाहिजे. शासनाच्या आदेशाचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. शासन आपल्या सेवेत आहे. आपल्या भल्यासाठीच काम करीत आहे. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

Web Title: Corona should not be intimidated, but the danger is not avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.