कोरोना लसीकरणात यवतमाळ राज्यात तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:00 AM2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:29+5:30

संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

Corona vaccinated in Yavatmal state | कोरोना लसीकरणात यवतमाळ राज्यात तळाला

कोरोना लसीकरणात यवतमाळ राज्यात तळाला

googlenewsNext

विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सव आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे. त्यातच येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील शाळाही गजबजणार आहेत. बहुतांश निर्बंधही शिथिल झाले आहेत. अशा स्थितीत कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. राज्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहिली असता यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यांत आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामध्ये तळाला असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये यवतमाळचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी ३८.६ टक्के, हिंगोली ४१.०८ टक्के, यवतमाळ आणि अकोला प्रत्येकी ४२ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात ४२.३ टक्के लसीकरण झाले आहे. सिंधुदुर्ग, भंडारासारख्या दुर्गम जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले असताना यवतमाळ मागे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
व्यापक जनजागरणाची गरज
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने आता लसीकरण मोहिमेला गती देण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थासोबतच लोकप्रतिनिधी संस्था संघटनांनीही लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

प्रशासन देणार जनजागृतीवर भर 
जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या लसीच्या पुरवठ्यानुसार जिल्ह्यात आजवर लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. प्रारंभीच्या काळात ग्रामीण भागातून लसीकरणासाठी वेग कमी होता. आता ग्रामीण भागातही लस पुरवठा वाढविण्यात येणार असल्याने या मोहिमेला वेग येईल. प्रशासनाच्या वतीने जनजागृतीवरही भर देण्यात येईल. साधारण दोन महिन्यांत जिल्ह्यातील लसीचा पहिला डोस पूर्ण करण्यात येईल.
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

मागणी होती तेव्हा डोस कमी मिळाले
मध्यंतरी लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. नेमके त्यावेळी लसीचे डोस कमी उपलब्ध हाेत होते. याचा परिणाम मोहिमेवर झाला. ग्रामीण भागामध्ये लस घेण्याबाबत उदासीनता आहे. काही ठराविक भागांमध्ये हा वेग खूपच कमी आहे. अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पहिला डोस डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण व्हावा, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामीण भागातील उदासीनतेचा परिणाम
जिल्ह्यामध्ये सध्या लसीकरणाचा वेग कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही नागरिकांत उदासीनता पाहायला मिळते. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येत नाहीत. पुसद, यवतमाळसारख्या शहरात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. लसीकरण वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.
- डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी
 

Web Title: Corona vaccinated in Yavatmal state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.