कोरोना संचारबंदीतच उरकायचा होता बालविवाह, प्रशासनाने टाकली धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:14 PM2021-04-17T18:14:31+5:302021-04-17T18:14:41+5:30
तहसिलदारांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तत्काळ याबाबत संपर्क साधला.
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संकट असताना बालविवाहांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या १५ दिवसात तब्बल पाच बालविवाह उधळून लावलेले असतानाच आणखी एक बालविवाह २२ एप्रिल रोजी नियोजित असल्याचे समोर आले. मात्र, शनिवारीच लग्नघरी पोहोचून प्रशासनाने तो रोखला.
नेर तालुक्यातील मुकींदपूर बेडा येथील १६ वर्षीय बालिकेचे लग्न २२ एप्रिल रोजी लावून दिले जाणार होते. मात्र, याबाबतची माहिती नेरचे तहसीलदार अमोल पोवार यांच्यापर्यंत पोहोचली.
तहसिलदारांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तत्काळ याबाबत संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने थेट मुलीच्या घरी पोहोचून तिच्या जन्मतारखेची व वयाची शहानिशा करण्यात आली. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे बालविवाह रोखण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी बालिकेच्या कुटुंबाला तिचे वय १८ होईपर्यंत विवाह न लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच लेखी हमीपत्र घेण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परिविक्षा अधिकारी महेश हळदे, ग्रामसेवक आर. निमकर, नेरचे पोलीस निरीक्षक घुगे, अंगणवाडी पर्यवेक्षिका पवार यांनी पार पाडली.