कोरोना योध्दे : आंतरवासीता डॉक्टर भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 06:44 PM2020-10-13T18:44:55+5:302020-10-13T18:45:19+5:30
Internship Doctor Yawatmal News मार्च महिन्यापासून दिवसरात्र राबणारे खरे कोरोना योध्दे शासनदरबारी दुर्लक्षित आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुगांना कोरोनामुक्त करण्यासाठी मार्च महिन्यापासून दिवसरात्र राबणारे खरे कोरोना योध्दे शासनदरबारी दुर्लक्षित आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासीता डॉक्टरांना कोणतीच सुविधा मिळत नाही. मुंबई, पुणे, अकोला येथे आंतरवासीता डॉक्टरांना नियमीत कोरोना भत्ता दिला जात आहे.
कारोना काळात तुटपुंज्या विद्यावेतनावर ‘मेडिकल’मध्ये असलेले १४३ आंतरवासीता डॉक्टर राबत आहे. कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेची संपूर्ण जबाबदारी ही आंतरवासीता डॉक्टरांवरच असते. पडद्यामागचे खरे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात. वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर त्यांना वर्षभर आंतरवासीता करावी लागते. प्रत्येक गोष्ट शिकायला मिळावी म्हणून हे डॉक्टर जीव लावून काम करतात. वरिष्ठांच्या दडपणात ते काम करतात. कोविड काळात सर्वात पहिले कामाला जुंपले गेले ते आंतरवासीता डॉक्टरांनाच. त्यांनीही तितक्याच तत्परतेने आपली सेवा देणे सुरू केले. कोरोना काळात सर्वच शासकीय कर्मचारी कोरोना भत्ता मिळविण्यासाठी आग्रही आहेत.
आपत्ती व्यवस्थापन निधीतून तरतूद
आंतरवासीता डॉक्टरांचे कोरोना काळातील योगदान लक्षात घेऊन मुंबई, पुणे व अकोला येथे कोरोना भत्ता लागू केला. तेथील आंतरवासीता डॉक्टरांना ३९ हजार रुपयापर्यंत हा भत्ता दिला जात आहे. कोरोना भत्ता दिला जावा यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी निर्देश दिले आहेत. यावरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती निवारण निधीतून आर्थिक तरतूद केली आहे. या निधीतूनच खºया कोरोना योद्ध्यांना दिला जात आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांनीसुध्दा हा भत्ता सुरू केला आहे. यवतमाळात मात्र आंतरवासीता डॉक्टर कोरोना भत्त्यापासून वंचित आहेत.
प्रोत्साहन भत्त्यासाठी महिन्याला ३० लाखांची आवश्यकता आहे. शासन हा निधी देत नाही. मुंबई, पुणे व अकोल्यात स्थानिक महानगर पालिकांनी आर्थिक तरतूद केली आहे. यवतमाळात तशी आर्थिक सक्षमता नाही. आंतरवासिता डॉक्टरांना विद्या वेतन मात्र नियमित दिले जात आहे.
- डॉ.मिलिंद कांबळे
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय