कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:00 AM2021-05-15T05:00:00+5:302021-05-15T05:00:02+5:30
यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण न घेताच हजारो विद्यार्थी नर्सरी, केजी या वर्गांऐवजी थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाने २०२०-२१ हे शैक्षणिक सत्र शाळेविनाच पार पडले. तर आता २०२१-२२ चे शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी उरलेला असताना शिक्षण विभागात नव्या नियोजनाबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. शिक्षक, पालक यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले तर शाळा नियोजित तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने सुरू होऊ शकतील, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहे.
मात्र यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण न घेताच हजारो विद्यार्थी नर्सरी, केजी या वर्गांऐवजी थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी अद्यापही शिक्षण विभागाकडून कोणतेही नियोजन आखण्यात आलेले नाही.
नव्या शैक्षणिक सत्राकरिता जिल्हा शिक्षण विभागाने बालभारतीकडे नव्या पुस्तकांची मागणीही नोंदविली आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडील जुनी पुस्तके गोळा करण्याचीही मोहीम सुरु आहे. कोरोनाचे संकट ओसरले आणि लसीकरण पूर्ण झाले तर जूनअखेरीस शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता यंदाही ऑनलाईनच शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे.
४३ हजार विद्यार्थी थेट दुसरीत जाणार
जिल्ह्यात ४३ हजार १५० विद्यार्थी एकही दिवस शाळेत न जाता आता थेट दुसरीत जाणार आहे. यात २२ हजार ३४४ मुले व २० हजार ८०६ मुलींचा समावेश आहे.
गाव तिथे अभ्यासवर्ग भरविण्याचे नियोजन
२०२१-२२ हे शैक्षणिक सत्र महाराष्ट्रात १५ जून तर विदर्भात २६ जून रोजी सुरू होणार आहे. मात्र कोरोनामुळे शाळा उघडणार की नाही, याबाबत संभ्रम आहेच. शाळा उघडल्या किंवा उघडल्या नाही तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग गावागावात अभ्यासवर्ग सुरू करणार आहे. त्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांच्या मदतीने दहा-दहा विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना शिकविले जाणार आहे. असा प्रयोग मोहा येथे यशस्वीही झाला.
शिक्षणाधिकारी म्हणतात... खेड्यांमध्ये अडचण नाही
मागील वेळी पावसाळा आणि हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात कमी आढळले. यंदाही शंभर टक्के लसीकरण झाल्यास शाळा भरविण्यास हरकत नाही. जिल्ह्यातील हजार ते बाराशे शाळांची पटसंख्या फार कमी आहे. तेथे विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचीही अडचण येणार नाही. यंदा विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढले जाईल. सुरुवातीला विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती केली जाईल. त्याचा अध्ययन स्तर लक्षात घेऊन तेथून पुढे शिकविले जाईल. मागील वर्गाच्या उजळणीसाठी एससीआरटीई लवकरच उपक्रमही राबविणार आहे.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक !
यावर्षी आमची परीक्षा झाली नाही. मात्र मी ऑनलाईन क्लासेसमध्ये खूप अभ्यास केला. परीक्षेची पूर्ण तयारी होती. पुढच्या वर्षी तरी शाळा भरावी अशी माझी खूप इच्छा आहे. सगळीकडे कोरोनाची भीती असली तरी काळजी घेऊन शाळेत जाता येईल. शाळेत अभ्यास करण्याची वेगळीच गोडी असते.
- मनन घोडाम, विद्यार्थी.
कोरोनाचे भय बाळगून शाळा बंद ठेवणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना काहीही न शिकविता पुढच्या वर्गात पाठविणे म्हणजे त्यांचे नुकसान आहे. शासनाने नाटकं करण्यापेक्षा प्रॅक्टीकल गोष्टींकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना साधने उपलब्ध करून द्यावी. शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे.
- साहेबराव पवार
जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
गेल्या वर्षभरात मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे जरी खरे असले तरी कोरोना संक्रमनाची तीव्रता लक्षात घेता नवीन शैक्षणिक सत्रात ऑफलाईन शाळा घेण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू कराव्या. कारण अनेक शिक्षकही पाॅझिटिव्ह निघाले आहे.
- गजानन पोयाम
पालक