कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:52+5:302021-04-07T04:41:52+5:30

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या ...

Corona's casualties exceed seven hundred | कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

Next

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक

यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या साडेतीनशे दिवसात ७०१ माणसांचा बळी घेतला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सुरू असलेली मृत्यूमालिका मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्ण मारले. तर दिवसभरात ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अजूनही ३१०२ रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून कायम असलेला २.२४ हा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही.

मंगळवारी दगावलेल्या सात जणांपैकी तिघे यवतमाळातील आहेत. त्यात एक ६२ व एक ७२ वर्षीय पुरुष आहे. तसेच एका ५८ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. याशिवाय महागावमधील ६१ व ८२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, वणी येथील ७८ वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३५७ जणांपैकी २०७ पुरुष तर १२० महिला आहेत. यात १०६ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमाळात आढळले हे विशेष. तसेच उमरखेड ८१, महागाव २९, पुसद २३, कळंब १४, नेर १४, झरी जामणी १४, घाटंजी ११, आर्णी ११, वणी १०, दारव्हा ९, दिग्रस ८, पांढरकवडा ५, बाभूळगाव ४ तर अन्य शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मंगळवारी एकूण ३३९३ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी ३२७ पॉझिटिव्ह तर ३०६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १५९६ रुग्ण रुग्णालयात भरती असून १५०६ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या तब्बल ३१ हजार २७९ आहे. गेल्या २४ तासात ३३७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४७६ इतकी आहे. या दरम्यानच्या काळात ७०१ नागरिकांचा मृत्यू नोंदविला गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १०.७१ असून मृत्यूदर २.२४ इतका आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ९८१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन लाख ८९ हजार ९५ अहवाल प्राप्त झाले. तर दोन हजार ८८६ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच दोन लाख ५७ हजार ८१६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

बॉक्स

संक्रमणाची गती थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना पसरण्याचा वेग गेल्या महिनाभरापासून कायम आहे. दररोज सुमारे ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या १५ दिवसांपासून दहापेक्षा जास्त आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन हा दर कमी करण्याचे नुकतेच निर्देशही दिले. मात्र प्रशासनाने जंगजंग पछाडल्यानंतरही पॉझिटिव्हिटी दर मंगळवारपर्यंत १०.७१ इतकाच कायम होता. त्याहून गंभीर म्हणजे दररोज ८ ते १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही १५ दिवसांपासून २.२४ इतकाच कायम आहे. पॉझिटिव्हिटी आणि डेथ रेट हे दोन्ही आकडे कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.

Web Title: Corona's casualties exceed seven hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.