कोरोनाचे युद्ध मोठे... फौज अर्धी... तरी हिंमत तगडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:11+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची ३५८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी १०० पदे रिक्त आहेत. तर ४७ परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. यात १७ परिचारिका प्रसूती रजेवर आहेत. ३ क्षयरोगाने ग्रस्त आहेत. ४ बालसंगोपन रजेवर आहेत. अन्य ५ जणी वैद्यकीय रजेवर आहेत. लॉकडाऊनमुळे गावाकडेच अडकल्याच्या कारणावरून चार जणी गैरहजर आहेत.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा एकेक रुग्ण वाढत असताना त्यांच्या सेवेची जबाबदारी परिचारिकांवर आली. पण मेडिकलमध्ये परिचारिकांचाच तुटवडा निर्माण झाला आहे. परिचारिकांची निम्मीच पदे कार्यरत असतानाही कोरोनासारख्या मोठ्या संकटावर मात केली जात आहे. युद्ध मोठे असताना फौज अर्धी उरलेली आहे, तरीही परिचारिका तगड्या हिमतीने हे संकट परतवून लावत आहेत. म्हणून तब्बल ९६ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होऊन घरी परतू शकलेले आहेत.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची ३५८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी १०० पदे रिक्त आहेत. तर ४७ परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. यात १७ परिचारिका प्रसूती रजेवर आहेत. ३ क्षयरोगाने ग्रस्त आहेत. ४ बालसंगोपन रजेवर आहेत. अन्य ५ जणी वैद्यकीय रजेवर आहेत. लॉकडाऊनमुळे गावाकडेच अडकल्याच्या कारणावरून चार जणी गैरहजर आहेत. तर चौघी दिव्यांग असल्याने त्यांना अधिक ताणाचे काम दिले जात नाही. तर १० परिचारिकांचे मूल लहान असल्याच्या कारणावरून सध्या रजेवर आहेत. तर ८ परिचारिका अनेक दिवसांपासून शैक्षणिक कारणासाठी रजेवर होत्या. मात्र नुकतेच त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले आहे.
अशा प्रकारे साडेतीनशेपैकी दीडशे परिचारिकांचा तुटवडा असतानाही रुग्णांची मात्र पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्याचे कारण आहे, परिचारिकांनी केलेले नियोजन. रुग्णालयातील जवळपास १००० बेड आणि त्यात कोरोनाच्या आयसोलेशन वॉर्डची भर पडली आहे. त्यातच काही सारीचेही रुग्ण आहेत. त्यामुळे परिचारिकांची अल्पसंख्या तीन ठिकाणी विभागली जात आहे. याही कसरतीत त्यांनी जबाबदारीचे निट वाटप केले. कोरोना वॉर्डासाठी परिचारिकांच्या खास बॅच तयार केल्या. त्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार प्रतीक्षायादी तयार आहे. एका बॅचला सात दिवस ड्यूटी आणि सात दिवस क्वारंटाईन कालावधी दिला जातो.
क्वारंटाईन नर्सेसला विश्रामगृहात, वसतिगृहात ठेवले जात आहे. मात्र त्यांच्यासाठी तेथेही दैनंदिन कामांचे वेळापत्रक ठरलेले आहे. सकाळी व्यायाम, योगा, दुपारी भावगीत, त्यानंतर अंताक्षरी, मेहंदी, नृत्य अशा उपक्रमांतून या परिचारिकांचे मनस्वास्थ्य टिकविले जात आहे. दररोज कुटुंबीयांना व्हीडीओ कॉल करून त्यांना बोलतेही केले जाते.
कोरोना कक्षात सेवा देणारे देवदूत
कोरोना कक्षात १६ परिचारिका सेवा करीत आहेत. यात सुखदेव राठोड, प्रदीप माने, स्वाती रोडे, संगीता चव्हाण, सैना मावची, राजश्री गडमले, प्राची कोसुरकर, नम्रता ढोबळे, निशा राठोड, पूजा राठोड, रुपा अडकी, भाग्यश्री शेलूकार, करुणा मगर, सुनिता वाळे, नंदिता बाभूळकर, वर्षा कुमरे यांचा समावेश आहे. तर अधिसेविका प्रभा चिंचोळकर, विभागीय परिसेविका वंदना उईके, वनमाला राऊत ‘सुश्रूषे’चे नियोजन करीत आहेत.
स्त्रीरोग विभागाचा ताण
कोरोना काळात इतर खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे मेडिकलमध्ये स्त्री रुग्णांचे प्रमाण वाढले. दररोज येथे २० प्रसूती होत आहे. लॉकडाऊन असूनही अपघात न थांबल्याने मेडिसीन विभागाचाही ताण वाढला आहे. या प्रत्येक ठिकाणी परिचारिकांची ड्युटी लागल्याने अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या अधिक तीव्र होत आहे.