CoronaVirus : यवतमाळातील १२ जणांचा दिल्लीच्या निजामुद्दीन संमेलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:52 PM2020-04-01T15:52:17+5:302020-04-01T16:01:29+5:30
coronavirus : दिल्ली येथे अलिकडेच निजामुद्दीन संमेलन भरले होते. देश-विदेशातून नागरिक तेथे सहभागी झाले.
यवतमाळ : कोरोना संशयितांबाबत प्रशासनाकडून खास खबरदारी घेतली जात असतानाच जिल्ह्यातील १२ जण दिल्ली येथे पार पडलेल्या निजामुद्दीन संमेलनात सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोरोना संशयित म्हणून हे १२ जण आरोग्य प्रशासनाच्या रडारवर आले आहे.
दिल्ली येथे अलिकडेच निजामुद्दीन संमेलन भरले होते. देश-विदेशातून नागरिक तेथे सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तेथून कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय आहे. यामुळे या संमेलनात नेमके किती आणि कुठले लोक सहभागी झाले याचा शोध सर्व राज्यांनी घेतला. त्यातूनच यवतमाळ जिल्ह्यातील १२ लोक संमेलनाला गेले होते, अशी माहिती व त्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली.
प्रशासनाने लगेच या १२ व्यक्तींची शोधाशोध चालविली. त्यातील पाच जण परत आल्याचे आढळून आले. त्यांना आता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले आहे. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाही. अहवालानंतरच हे पाच जण पॉझिटीव्ह की निगेटीव्ह हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच उपचाराची पुढील दिशा निश्चित होईल.
‘ते’ सात जण दिल्लीत थांबल्याची शक्यता
दरम्यान संमेलनाला गेलेले उर्वरित सात जण जिल्ह्यात अद्याप परतले नसल्याची खात्री प्रशासनाने केली आहे. त्या सात जणांचा शोध सुरू आहे. ते एक तर दिल्लीत थांबले असावे, प्रवासादरम्यान अन्य राज्यात किंवा महाराष्टÑातील एखाद्या जिल्ह्यात अडकले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाकडून त्यांची माहिती घेतली जात आहे.