CoronaVirus: इराणला १३ जण गेलो होतो, सुदैवाने सारेच सुखरूप परतलो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 08:02 PM2020-03-07T20:02:33+5:302020-03-07T20:03:52+5:30
प्रशासन मागावर असलेल्या सौदागर अशपाकचा व्हिडिओ जारी, दाम्पत्य नागपुरातील रहिवासी
यवतमाळ : आम्ही १३ जण यात्रेकरिता इराणला गेलो होतो, तेथून सुखरूप परतलोही, आमची प्रकृती ठणठणीत आहे. कुणालाच सर्दी, खोकला, ताप यापैकी काहीही नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, फोन करून विचारणा करणाºया प्रशासनालाही तसे सांगण्यात आले आहे. ही माहिती यवतमाळ व नांदेडचे प्रशासन मागावर असलेल्या अशपाकने माहूरहून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून दिली आहे.
इराणवरून आलेले दाम्पत्य दिल्ली विमानतळावरील निगरानी कक्षातून तपासणी अर्धवट सोडून पळून गेले व ते माहूर येथे दरगाहवर दर्शनासाठी आले, असा मेल नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांनी यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविला. या मेलनंतर या दाम्पत्याची यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात शोधाशोध करण्यात आली. या दाम्पत्याला कोरोना व्हायरस तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली गेली. परंतु शनिवारी या दाम्पत्याने स्वत:च आपला व्हिडिओ जारी करून आपण कुठेही पळालो नाही व प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे. सौदागर अशपाक अहेमद व पत्नी सुलताना बेगम अशपाक अहेमद असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी आहेत. आपणच नव्हे तर इराणला सोबत असलेल्या सर्वांचीच प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
नागपुरात रेल्वे स्थानकावर तपासणी नाही
सौदागर अशपाक यांनी सांगितले की ते इराणहून यात्रा करून २५ फेब्रुवारी रोजी मुंबईला परतले. तेथून पुढे प्रवास करीत ५ तारखेला दुरांतो एक्सप्रेसने नागपुरात पोहोचले. परंतु तेथे कुणीही त्यांची आरोग्य तपासणी केली नाही. माहुरला गेलो असताना केवळ तुमची प्रकृती कशी आहे, अशी विचारणा करणारा फोन कॉल आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याबाबत प्रसार व सामाजिक माध्यमांवर फिरणाºया बातम्या या अफवा असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.