coronavirus: मेडिकलमध्ये कोरोना रुग्णाच्या जेवणात सापडल्या अळ्या, गरीब, श्रीमंत असा दुजाभाव होत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 02:53 PM2020-07-19T14:53:00+5:302020-07-19T14:53:09+5:30
शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या.
यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जेवणाबाबत सुरुवातीपासून तक्रार आहे. शनिवारी रात्री मेडिकलमधील गर्ल्स होस्टेलमध्ये ठेवण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात चक्क मृत गोम आढळली. यापूर्वी ६ एप्रिलला जेवणाच्या डब्यात अळ्या निघाल्या होत्या. हे निकृष्ट अन्न आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. आजारातून बरे होण्याऐवजी तो आणखी वाढण्याचा धोका रुग्णांनी व्यक्त केला.
शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणाºया जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. या प्रकाराची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांमध्येही दुजाभाव होत असल्याचा आरोप नेर येथील एका रुग्णाने केला आहे. पेट्रोलपंप मालक असलेल्या कुटुंबाला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती तर सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील कोरोना संशयिताकडे व रुग्णांकडे कुणीही फिरकत नसल्याचे वास्तव त्याने अभ्यागत मंडळाच्या सदस्य प्रा.डॉ.प्रवीण प्रजापती यांच्याकडे मांडले. या गंभीर प्रकाराची तत्काळ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश सिंग यांच्याकडे तक्रारही करण्यात आली. मात्र त्यानंतरही फार काही सुधारणा झालेली नसल्याचे सांगण्यात येते.
पॉझिटिव्ह आजीच्या देखभालीसाठी ठेवले नातवाला
शासकीय रुग्णालयात अजब कारभार सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८५ वर्षीय आजीच्या देखभालीसाठी चक्क कोरोना नसलेल्या नातवाला ठेवले आहे. वयोवृद्ध आजीची देखभाल करावी, तिला डोळ्याने दिसत नाही, ती चालू शकत नाही अशी विनवणी नातवाने कोरोना वॉर्डातील डॉक्टरांकडे केली होती. मात्र त्या नातवालाच तुझ्या आजीची देखभाल तुलाच करावी लागेल असे दरडावण्यात आले. आजीच्या प्रेमापोटी नातवाने चक्क कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डात थांबण्याचा निर्णय घेतला. प्रकरण अंगलट येत असताना दिसताच रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करत तो नातू स्वेच्छेने कोरोना वॉर्डात राहात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र नातवाचा नाईलाज असल्याचे त्याने सांगितले.