CoronaVirus News in Yavatmal: किराणा किटच्या वादावरून शिवसेना खासदाराच्या स्विय सहाय्यकाच्या घरावर महिलांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:14 PM2020-05-03T14:14:53+5:302020-05-03T14:15:26+5:30
शिवसेनेच्या दोन गटात पेटला वाद
नेर (यवतमाळ): नेर तालुक्यात खासदार भावनाई गवळी यांनी पाठवलेल्या किटवरुन नेर येथे शिवसेनेत राजकारण पेटल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. भावना गवळी यांचा नेर तालुक्याचा कारभार बघणारा स्वीय सहाय्यकाच्या घरावर काल सायंकाळी महिला व नागरिकांचा मोर्चा नेला. या नागरिकांना पोलिसांनी पांगवले.
लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी खासदारांकडून आणण्यात आलेल्या किट नेमक्या कुणासाठी व कुठे वाटल्या यावरून हा वाद झाला. नेर तालुक्यातील गरजुंना किराणा किट म्हणून भावना गवळी यांनी २७५ किट पाठवल्या. या किट स्थानिक छत्रपती नगरसाठी आल्याच्या कारणावरून या परिसरातील शिवसैनिकांनी खासदाराचे स्वीय साहाय्यक नितिन खैरे यांना विचारणा केली. मात्र खैरे यांनी या किट गरजूंमध्ये वाटल्या. त्या छत्रपती नगरसाठी नव्हत्या असे सांगितले. मात्र तोपर्यंत किट आल्याची माहिती छत्रपती नगर परिसरात पोहोचली व शंभर ते दीडशे नागरिकांचा जमाव खैरे यांच्या घरावर आला व किटची मागणी केली. यावेळी खासदारांच्या विरोधात घोषणाही झाल्या व खैरे यांना धक्काबुक्कीही झाली. यामुळे नेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना हा जमाव पांगवला. याबाबत खैरे यांनी पोलिसात तक्रार करत असल्याचे सांगितले. तर गवळी यांनी पोलीस अधिक्षकांना फोन करून माहिती दिली. या घटनेचा अधिक तपास नेर पोलीस करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.