coronavirus : बचत गटाच्या महिलांची तयार केले एक लाखाहून अधिक मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 05:56 PM2020-04-21T17:56:10+5:302020-04-21T17:58:10+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे.
यवतमाळ - कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाविरुध्दची लढाई प्रत्येकच जण आपापल्या परीने लढत आहे. शासकीय यंत्रणेसोबतच दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आदींचे या लढाईत सहकार्य मिळत आहे. यात बचत गटाच्या महिलासुध्दा मागे नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ जिल्हा कार्यालयद्वारा स्थापित लोक संचालित साधन केन्द्र अंतर्गत महिला बचत गटाचे सक्षमीकरणाचे कार्य करते. कोरोना विषाणूच्या संकटात या संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. याच अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाद्वारे मास्क तयार करण्यात आले. 10 तालुक्यातील 93 गावातील 188 बचतगटाचे यासाठी सहकार्य मिळाले. या बचत गटाच्या 530 महिलांनी एकूण 1 लक्ष 8 हजार 409 मास्क शिवण्याचे काम या महिलांनी केले.
यात महिलांनी सुरवातीला 5 लक्ष 75 हजार 400 रु गुंतवणूक केली. यातून त्यांनी मास्क तयार करण्याकरीता स्थानिक बाजारपेठेतून सुती कापड खरेदी केले. सदर मास्क तयार झाल्यावर त्यांनी नगर पालिका, बँक, विविध रुग्णालये, ग्राम पंचायत, मेडिकल स्टोर, सामाजिक संस्था आदी ठिकाणी पुरवठा केला. यातून बचत गटाच्या महिलांना निव्वळ नफा 8 लक्ष 53 हजार 253 रु. झाला. याशिवाय 64 महिलांनी 1743 मास्क मोफत शिवून दिले. तसेच गावातील अतिशय गरीब व गरजू, दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तुंच्या 2469 किट्स वाटप केले. शिवभोजन योजनेअंतर्गत 11262 गरीब लोकांसाठी महिला बचत गटाने भोजनाची व्यवस्था केली.
मास्क विक्रीतून रोजगार : संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे महिलांनी मास्क शिवून रोजगार मिळविला. तसेच कोरोनाच्या या लढाईत आपले योगदानसुध्दा दिले. दारव्हा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी ललिता महादेवराव महल्ले म्हणाल्या, आमच्या गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. सर्वांना मास्क शिवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने 100 मीटर कापड दिला. यातून 1500 मास्क मी शिवून दिले. ग्रामपंचायतीने प्रति नग सहा रुपये देण्याचे कबूल केले मात्र मी प्रति नग पाच रुपये याप्रमाणे 1500 रुपये कमी घेतले. समाजसेवा केल्याचाही आनंद झाला. मास्क विक्रीतून 7500 रुपये मिळाले, असे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न उभा राहिल्यावर वणी येथील गोकूळ नगरात राहणा-या प्रियंका राजू काकडे यांनी मास्क शिवणे व त्याची विक्री करणे, हा पर्याय निवडला. सुरवातीला त्यांनी 100 मास्क तयार करून वॉर्डामध्येच विकले. यानंतर नगरसेवकांनी एक हजार मास्कची ऑर्डर दिली. त्यासाठी कॉटनचा कापड खरेदी केला. पाच हजार रुपयांचा कापड व इतर खर्च दीड हजार असा एकूण मला साडेसहा हजार रुपये खर्च आला. तर मास्क विक्रीतून 19500 रुपये मिळाले. म्हणजे निव्वळ नफा 13 हजार रुपये झाला, असे काकडे यांनी सांगितले.