CoronaVirus: अत्यावश्यक वस्तू घरपोच; पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 06:54 PM2020-03-28T18:54:41+5:302020-03-28T18:55:09+5:30

फक्त एका मेसेजवर पोलीसच घरी आणून देणार जीवनावश्यक वस्तू; एसपींचा पुढाकार

CoronaVirus in yavatmal police home delivers essential goods to citizens kkg | CoronaVirus: अत्यावश्यक वस्तू घरपोच; पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

CoronaVirus: अत्यावश्यक वस्तू घरपोच; पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

Next

यवतमाळ : ज्या पोलिसांचे नाव घेताच नागरिक भीतीने चळचळा कापतात, तेच पोलीस दिलदार मित्रासारखे चक्क नागरिकांच्या घरापर्यंत किराणा माल पोहोचवून देत आहेत. या सेवेतूनही नागरिकांचे आरोग्य रक्षण व्हावे एवढाच उद्देश आहे. 

सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात कडेकोट संचारबंदी लागू आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना आढळत आहे. नाईलाजाने यातील काहींना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसादही दिला. त्या प्रसादामागेही नागरिकांचे आरोग्य राखण्याचाच उद्देश आहे. मात्र आता पोलिसांनी दंडुक्यापेक्षाही वेगळा आणि नरमाईचा मार्ग पत्करला आहे. 

पोलीस अधीक्षकांचा उपक्रम
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जनहिताचा उपक्रम हाती घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी घराबाहेर पडण्याऐवजी पोलीस स्वत:च नागरिकांना घरपोच वस्तू नेऊन देत आहेत. त्यासाठी खास ९३५६७५८७७६ हा व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर लागणाऱ्या वस्तूंची यादी पाठवायची आहे. या सोबतच पोलीस विभागाने ‘एसपीजीई टीईए’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपवरही नागरिकांना आपली मागणी नोंदविता येते. 

यवतमाळात पोलिसांनी अशा प्रकारची सेवा सुरूही केली आहे. पोलिसांची एक विशेष चमू यासाठी सक्रिय झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरी किराणा माल व इतर आवश्यक वस्तू पोहोचवून दिल्या जात आहे. यानिमित्ताने संचारबंदीचे काटेकोर पालन होत आहे तर दुसरीकडे कोरोना संसर्गासाठी धोकादायक असलेली नागरिकांची गर्दीही टाळली जात आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे खुद्द पोलीसच वस्तू आणून देत असल्याने त्या वस्तूच्या दर्जाविषयी देखील नागरिकांना खात्री वाटत आहे. 

राज्यातील पहिलाच प्रयोग
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कल्पनेचे सर्वत्र स्वागत होत आहे. नागरिकांनी घरातच राहावे म्हणून चक्क पोलिसांनी घरपोच जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्याची ही राज्यातील पहिलीच कल्पना आहे. हा पॅटर्न अन्य जिल्ह्यातही राबविला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नये, असाच पोलिसांचा प्रयत्न आहे. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठीच जीवनावश्यक वस्तू पोलिसांच्या माध्यमातून घरपोच पोहोचविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचे चांगले परिणाम संचारबंदीत दिसू लागले आहेत. 
- एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ

Web Title: CoronaVirus in yavatmal police home delivers essential goods to citizens kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.