Coronavirus in Yawatmal ; कोरोना चाचणी निगेटीव्ह असेल तरच बँकेत या... ; पांढरकवडा स्टेट बॅकेचा फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:50 PM2021-05-10T17:50:57+5:302021-05-10T17:51:15+5:30
Yawatmal news कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवा व नंतरच बँकेत प्रवेश देणार असल्याचा फतवा सोमवारी येथील स्टेट बँकेने काढल्यामुळे कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी बँकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवा व नंतरच बँकेत प्रवेश देणार असल्याचा फतवा सोमवारी येथील स्टेट बँकेने काढल्यामुळे कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी बँकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शेतकरी, शेतमजुरांपासून तर कर्मचारी या सर्वांचेच खाते आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी खातेदार बँकेत येतात. त्यांना यवतमाळ, नागपूर येथील दवाखान्यात पैसे ट्रान्सफर करावी लागते. सोमवारीसुद्धा असे बरेचसे खातेदार बँकेत आले. परंतु, त्यांना बँकेच्या गेटवरच बँकेत जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पं.स.चे माजी सभापती रीतेश परचाके हेसुद्धा बँकेत गेले होते. त्यांनाही कोरोना निगेटिव्हचा अहवाल नसल्याने परत पाठविले. परचाके यांनी तीन दिवसांपूर्वीच टेस्ट केली. परंतु, त्याचा रिपोर्ट यायचा आहे, असे सांगितल्यावरही रिपोर्ट आल्यानंतरच येण्याचे सांगितले. विशेष म्हणजे, कोरोना टेस्ट केली नसतानाही दारू विक्रेते, पेट्रोल पंपचालक यांना मात्र बँकेत प्रवेश दिल्या गेला.
बँकेत खातेदारांची मोठी गर्दी होत असून, संसर्गाची भीती आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसारच आम्ही कोरोना चाचणी अहवाल मागत आहोत.
- अमोल रेवडकर,
शाखा व्यवस्थापक